माजी आमदार प्रकाश शेंडगे यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

सांगली : रायगड माझा वृत्त

आगामी निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार प्रकाश शेंडगे ‘राष्ट्रवादी’तून बाहेर पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधे खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी ‘राष्ट्रवादी’च्या सर्व पदांचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. राज्यातील ३४० ओबीसी, भटक्‍या समाजांच्या सामाजिक न्यायासाठीच्या लढ्याचे नेतृत्व करायचे असल्याने निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.

माजी आमदार प्रकाश शेंडगे हे माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे यांचे पुत्र आहेत. भाजपमध्ये असताना ते जतचे आमदार राहिले. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान आमदार असताना त्यांना उमेदवारी नाकारली. नाराज  होऊन ते राष्ट्रवादीत दाखल झाले. जतमध्ये लढलेही. त्यात त्यांचा पराभव झाला. सन २०१९ च्या  निवडणुकीत लढण्याची त्यांनी घोषणाही केली. मात्र, काल मुंबईत आझाद मैदानात झालेल्या कार्यक्रमावेळी राज्यातील ३४० जाती-जमातींच्या नेत्यांनी सामाजिक न्याय व आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व करण्याची गळ घातल्याने निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत