माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस चे जेष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन 

रायगड माझा वृत्त 

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांचं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. आज सकाळीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र नवी दिल्लीतील चाणक्यपुरी इथल्या प्रायमस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

मुंबई काँग्रेसमधील वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गेल्याच वर्षी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. सोनिया गांधी आणि पर्यायाने गांधी कुटुंबीयांच्या अत्यंत जवळचे असलेले गुरुदास कामत, यांनी मुंबईसह महाराष्ट्रात काँग्रेस वाढीसाठी मोलाची भूमिका बजावली.

गुरुदास कामत 2017 मध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस होते. त्यांच्याकडे गुजरात, राजस्थान, दादरा आणि नगर हवेली, दमन दिव या राज्यांची जबाबदारी होती. शिवाय ते काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही होते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळात त्यांचे आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचे वाद समोर आले होते.या वादानंतर, त्यांनी आपल्याला सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा, असं सांगत या सर्व पदांचा राजीनामा राहुल गांधींकडे दिला होता.

5 ऑक्टोबर 1954 रोजी गुरुदास कामत यांचा कर्नाटकातील अंकोला येथे जन्म झाला. त्यांचं बरेचसं आयुष्य मुंबईतील कुर्ल्यात गेलं. तेथेच ते लहानाचे मोठे झाले. गुरुदास कामत यांच्या कुटुंबात कुणीही राजकीय क्षेत्रात नव्हते. त्यांचे वडील वसंत आनंदराव कामत हे प्रीमियर ऑटोमोबाईल्समध्ये काम करत.

1980 मध्ये गुरुदास कामत यांची महाराष्ट्र प्रदेश यूथ काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. 1984 मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश यूथ काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. मग 1987 मध्ये त्यांची भारतीय यूथ काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. गुरुदास कामत हे 2003 मध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 2008 पर्यंत त्यांनी हे पद भूषवलं.

सोनिया गांधी यांची रुग्णालयाला  भेट 

गुरुदास कामत यांचा राजकीय प्रवास:

  • 1972 साली विद्यार्थी चळवळीतून राजकीय क्षेत्रात प्रवेश
  • 1976 साली एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
  • 1984 साली पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर
  • पाच वेळा ईशान्य मुंबईमधून लोकसभेत प्रतिनिधित्व
  • 2009 ते 2011 यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम
  • केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचाही अतिरिक्त कारभार
  • 2014 मध्ये शिवसेनेच्या गजानन किर्तीकरांकडून कामतांचा पराभव
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत