माजी न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं निधन

नागपूर : रायगड माझा वृत्त

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं आज पहाटे दीडच्या सुमारास नागपुरातील एका खासगी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. २००३ साली त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या रूपानं सर्वसामान्यांच्या कल्याणाची आस बाळगणारा व त्यासाठी प्रयत्न करणारा एक सच्चा व समन्वयी कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२७ रोजी मध्य प्रदेशातील रायपूर येथे झाला होता. नागपूरच्या चिटणीस पार्कजवळील प्राथमिक महापालिका शाळेत त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले. त्याच्यावर गांधी विचारांचा खूप मोठा पगडा होता. न्यायाधीशासोबतच ते उत्तम लेखक होते. १९३०, १९३२ आणि १९४२ मध्ये त्यांच्या वडिलांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं आणि १९४१ मध्ये त्यांनी स्वातंत्र्य सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनातही त्यांनी भाग घेतला होता. त्यांना सुमारे तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. चंद्रशेखर धर्माधिकारी यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला होता. त्यामुळे त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. परंतु, उपचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. अखेर आज पहाटे दीडच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

सायंकाळी अंत्यसंस्कार

धर्माधिकारी यांचं पार्थिव नागपूरमधील सर्वोदय आश्रमात सकाळी ९ वाजेपासून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी चार वाजता अंबाझरी घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत