माजी मुख्यमंत्र्यांना घेऊन हर्षवर्धन पाटलांची टू व्हिलर सुसाट

पुणे : रायगड माझा वृत्त

काॅंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेची बस निघायला उशीर होईल म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना घेऊन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काल ज्युपिटर स्कुटर जोरात चालवली अन् बस गाठली. दोन सत्ताधारी नेत्यांची ही टू व्हिलर राइड साहजिकच कौतुकाचा विषय बनले.

काॅंग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा काल सातारा जिल्ह्यात होती. या यात्रेनिमित्त सामान्य जनतेशी संवाद साधण्याचा काॅंग्रेस नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यातून कोठे टपरीवर चहा पिणे, चावडीवर जाऊन गप्पा मारणे, सर्वसामान्यांना सहजपणे भेटणे, असे उपक्रम सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून सर्व काॅंग्रेस नेत्यांनी काल गोपूज (ता. खटाव) येथे वनभोजन घेतले. साध्या सतरंजीवर बसून साध्या भोजनाचा आस्वाद या नेतेमंडळींनी घेतला. त्यासाठी मुख्य रस्त्यावर वाहने लावून पायी चालत वनभोजनाच्या ठिकाणी गेले.

यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह इतर नेते सहभागी झाले होते. ही सारी नेेतेमंडळी एकाच बसमध्ये प्रवास करत आहेत. जेवण झाल्यानंतर अनेक नेते मंडळी पायी चालत मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या बसमध्ये जाऊन बसले. याच वेळी पृथ्वीराज चव्हाणांना काही पत्रकारांनी गाठले असल्याने ते वनभोजनाच्या ठिकाणीच अडकले होते. अखेरीस पाटलांनी  तेथे असलेल्या कार्यकर्त्याची टू व्हिलर घेतली. त्यावर चव्हाणांना बसविले आणि सुसाट वेगाने मुख्य रस्त्यावर आणले.

एक माजी मुख्यमंत्री आणि माजी मंत्री यांच्या या राइडचे फोटो मग अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपले. ते सोशल मिडियावर शेअर केले. चव्हाण यांनाही बऱ्याच कालावधीनंतर टू व्हिलरवर बसण्याची संधी यामुळे मिळाली. माजी मुख्यमंत्र्यांचे सारथ्य करण्याचा मोका पाटलांना मिळाला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत