“माझे कुटुंब -माझी जबाबदारी” मोहिमे अंतर्गत विक्रोळीत तपासणीचा शुभारंभ !

भांडुप : किशोर गावडे

“माझे कुटुंब- माझी जबाबदारी” कोविड मुक्त महाराष्ट्र, मोहिमेअंतर्गत “एस” विभागाच्या कक्षेत येणाऱ्या विक्रोळी पूर्व विभागात नागरिकांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात झाली. मनपा

एस विभागाचे सहाय्यक आयुक्त विभास आचरेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विलास मोहकर व समाज विकास अधिकारी बाजीराव खैरनार यांच्या नियोजनबद्ध पद्धतीने व पर्यवेक्षणाखाली “माझे कुटुंब माझी जबाबदारी” आणि  कोविडमुक्त महाराष्ट्र मोहिमेला प्रारंभ झाला. यावेळी स्थानिक नगरसेवक उपेंद्र सावंत हे उपस्थित होते.

वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विलास मोहकर यांनी मोहिमेवर जाण्यापूर्वी कार्यक्रमाचे नियोजन कसे असावे, विभागात गेल्यानंतर नागरिकांशी कसा सुसंवाद साधावा. तपासणी कशा पद्धतीने करण्यात यावी. याची विस्तृत सविस्तर माहिती आरोग्य पथकाला कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत दिलेली होती. त्याचबरोबर सर्वेक्षण करताना लागणारे आवश्यक ते साहित्य पुरवले होते.

समाज विकास अधिकारी बाजीराव खैरनार या पथकात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळत असल्याचे दिसून आले. मनपा सहाय्यक आयुक्त विभास आचरेकर अधिक माहिती देताना म्हणाले, “कुटुंबातील नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणीला सुरुवात झाली आहे. आजाराचा प्रसार रोखण्यासाठी तसेच रोगाची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आरोग्य तपासणी मोहीम हाती घेत नागरिकांचे स्क्रीनिंग केले जाणार आहे. तपासणी मोहिमेत केंद्रप्रमुख, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशाताईं व स्थानिक स्वयंसेवक असे पथक तयार करण्यात आले आहेत.

भांडूप, कांजुरमार्ग, विक्रोळी, पवई, नाहूर या क्षेत्रात एकूण अंदाजे 2,17010  घरांचा समावेश आहे. या प्रत्येक घरांचा सर्वे करण्यात येणार आहे.  एका पथकात प्रामुख्याने 3 व्यक्ती असतील, अशा मनपा “एस” विभागाच्या संपूर्ण हद्दीत एकूण 290 टीमवर सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

 यावेळी पालिका प्रशासनाने 870 कर्मचारी  वर्गाचा समावेश केलेला आहे. आणि हे पथक  2,17010  घरांमध्ये जाऊन प्रत्येकाची आरोग्य तपासणी करणार आहेत. हे आरोग्य पथक रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा व अन्य आजाराविषयी माहिती नोंदणी संदर्भीय नमून्यात करतील. थर्मलगन, ऑक्सीमीटरच्या सहाय्याने शरीरातील तापमान व ऑक्सिजनची पातळी तपासणी करतील. त्याचबरोबर खोकला, दम लागणे,ताप अशी  कोविड सदृश्य लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्लानुसार तात्काळ  कोविड सेंटर मध्ये उपचाराबाबत व्यवस्था केली जाईल. यासाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. कुटुंबातील सदस्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत असल्यास अथवा कोणताही जुना आजार असल्यास त्याची सत्य माहिती आमच्या पथकाला द्यावी. जेणेकरून आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण होण्यापासून रोखण्यास प्रशासनाला मदत होईल. यासाठी पालिका प्रशासन आपल्या दारी आले असून नागरिकांनी आपली  माहिती देऊन सहकार्य करावे.व कुटुंबातील सर्वांनीच तपासणी करून घ्यावी.असे कळकळीचे आवाहन “एस” विभागातील सर्व नागरिकांना मनपाचे  “एस” “विभागाचे सहाय्यक आयुक्त विभास आचरेकर यांनी केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत