माझ्यावर हल्ला करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी दाखल करा -हिना गावित

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

मी आदिवासी समाजातून आलेली खासदार आहे म्हणून काल धुळ्यात मराठा आंदोलनाकांनी माझ्यावर हल्ला केला. या प्रकरणी अॅट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी खासदार हिना गावित यांनी केली. तसंच माझ्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांचा सत्कार केला जातोय ही अत्यंत शर्मेची बाब आहे. पोलीस जर एखाद्या महिलेला सुरक्षा देऊ शकत नसेल तर तेथील पोलीस अधिकाऱ्याची बदली करावी अशी मागणीही त्यांनी केली.

धुळ्यात रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी तीव्र आंदोलन केलंय. यावेळी तिथून जाणाऱ्या हिना गावित यांच्या गाडीवर आंदोलकांनी हल्ला केला. हिना गावित गाडीत असताना गाडीवर चढून धिंगाणा घातला. आज या प्रकरणाबद्दल हिना गावित यांनी लोकसभेत मुद्दा उपस्थितीत केला.

मी माझी बैठक संपून आपल्या कारने घरी जात होते  तेव्हा 200 ते 300 जणांनी माझ्यावर हल्ला केला. माझ्या गाडीवर चढून कारची काच फोडली. मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी माझ्या गाडीला घेराव घातला गेला होता तेव्हा तिथे फक्त चार पोलीस कर्मचारी होती. पण त्यांनी काहीही केलं नाही. फक्त पाहण्याची भूमिका घेतली होती. मी जर गाडीतून बाहेर पडली नसती तर माझा मृत्यूही झाला असता पण सुदैवाने माझ्या कार्यकर्त्यांनी मला बाहेर काढलं.मी याबद्दल तक्रार केली तेव्हा फक्त 15 ते 20 जणांना ताब्यात घेण्यात आलं आणि गुन्हा दाखल करून सोडून देण्यात आलं. मी विचारला असता चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलं अशी माहिती हिना गावित यांनी दिली.

पण मी ज्या बैठकीसाठी गेले होते त्यावेळी तिथे अनेक इतर आमदार आणि इतर समाजाची लोकं होती. पण फक्त माझ्याच गाडीवर हल्ला झाला. मी आदिवासी समाजाची असल्यामुळे माझ्या गाडीवर हा हल्ला झाल्याय. त्यामुळे या प्रकरणीची अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी गावित यांनी केली.

ज्या व्यक्तीने हे कृत्य केलंय त्याला तर सोडून देण्यात आलंय. पण असं कृत्य केलं म्हणून त्याचा जाहीर सत्कार करण्यात आला, त्याची मिरवणूक काढण्यात आली अशी धक्कादायक माहितीही त्यांनी दिली.

जर आमचे राज्याचे पोलीस महिलांचं संरक्षण करू शकत नसतील आणि एखाद्या गुन्हेगाराला संरक्षण देत असतील तर ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून तेथील पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावरही अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी गावित यांनी केली.

काय घडलं नेमकं ?

धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांना आज मराठा आंदोलनकांच्या रोषाचा सामना करावा लागला. धुळ्यातील नियोजन मंडळाच्या बैठकीत भुसे यांच्या विरोधात धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. तसंच खासदार हिना गावित यांची गाडीही आंदोलकांनी फोडल्याचं समोर आलं आहे. गाडीच्या काचा फोडून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. खासदार हिना गाडीत असतानाच ही तोडफोड करण्यात आली. पण या घटनेमुळे खासदार हिना गावित यांना धक्का बसलाय. आमचे काही कार्यकर्ते तिथे होते त्यामुळे त्यांनी मला बाहेर खेचून काढलं आणि मला बाजूला घेतलं. पण तरीही आंदोलकांचा राडा सुरूच होता. त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मला तिथे माझा मृत्यू समोर दिसत होता. आंदोलन अनेक प्रकारचे होतात पण एखाद्या महिला लोकप्रतिनिधींच्या गाडीवर असा हल्ला होत असेल तर हे निंदणीय आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत