माझ्या कवितेचा चुकीचा अर्थ घेतला: दीपक मन्वर

मुंबई : रायगड माझा वृत्त

‘माझ्या ‘पाणी कसं असतं’ या  कवितेचा चुकीचा अर्थ घेतला जात असून तो मला कवी म्हणून तर काय माणूस म्हणून ही अभिप्रेत नाही.’ असा खुलासा दीपक मन्वर यांनी केला आहे. मन्वरांची ‘पाणी कसं असतं’ ही कविता काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून काही आक्षेपांमुळे वगळली गेली. यावर स्पष्टीकरण देणारं निवेदन मन्वरांनी नुकतंच जाहीर केलं आहे.

मन्वर यांचा ‘दृष्य नसलेल्या दृष्यात’ हा काव्यसंग्रह यंदा मुंबई विद्यापीठाच्या पदवीच्या मराठी तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात घेण्यात आला होता. या काव्यसंग्रहातील ‘पाणी कसं असतं’ या कवितेत आदिवासी स्त्रीयांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं असल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. तसंच ही कविता अभ्यासक्रमातून वगळण्याची मागणीही या संघटनांनी केली होती. त्यानुसार ही कविता मुंबई विद्यापीठाने अभ्यासक्रमातून वगळली. विद्यापीठाच्या या निर्णयावर साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी सडकून टीका केली. या सगळ्या वादावर पडदा टाकण्यासाठी खुद्द दीपक मन्वरांनी आता एक स्पष्टीकरण जाहीर केलं आहे. या निवेदनात मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या असं म्हणत आदिवासी समाजाची त्यांनी माफी देखील मागितली आहे.

‘आदिवासी’ हा जातीवाचक शब्द नाही

‘पाणी कसं असतं’ या कवितेत पाण्याला आदिवासी स्त्रीयांच्या वक्षस्थळाची उपमा देण्यात आली असल्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली. अनेक आदिवासी संघटनांनी ती अभ्यासक्रमात घेण्याचा विरोध केला. त्यावर खुलासा करताना या कवितेत आदिवासी हा जातीवाचक शब्द नसल्याचं मन्वरांनी सांगितलं आहे.’मला जातीबद्दल लिहायचं असतं तर मी भिल्ल,ठकार,गोंड असे शब्द लिहू शकलो असतो. पण कवितेतील आदिवासी हा शब्द मुळात जातीवाचक नसून त्याचा अर्थ मुळचे,पहिले रहिवासी असा आहे.’ जगण्याच्या संवेदनांची आदिवासींच्या मुक्त जीवनशैलीशी तुलना या कवितेत केली असल्याचं मन्वर यांचं म्हणणं आहे.तसंच या तुलनेचा विश्वसृजनाच्या कल्पनेशी संबंध असल्यामुळे आदिवासी समाजाच्या स्त्रीयांबद्दल या कवितेत काहीच आक्षेपार्ह नाही असा खुलासा त्यांनी केला आहे.

कवितेसोबत पूर्ण काव्यसंग्रहच अभ्यासक्रमातून वगळा

फक्त पाणी कसं असतं ही कविताच वगळू नका तर ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ हा काव्यसंग्रहच अभ्यासक्रमातून मुंबई विद्यापीठाने वगळावा अशी मागणी दीपक मन्वरांनी केली आहे. आपल्या कवितेतील ओळीमुळे आदिवासी बांधवांना खूप त्रास झाला म्हणून मन्वरांना दु:ख झालं आहे.या त्रासासाठी माफी मागत हा काव्यसंग्रहच अभ्यासक्रमातून वगळून टाकावा अशी विनंती विद्यापीठाला मन्वरांनी या निवेदनात केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत