माणगांवमधील दिया जाईलकरच्या हत्या प्रकरणी एकास अटक

माणगांव पोलिसांची यशस्वी कामगिरी, गावातील युवकाने केली हत्या

माणगांव : प्रवीण गोरेगांवकर

माणगांव तालुक्यातील वावे येथील आठ वर्षीय बालिका कु. दिया जाईलकर हिच्या निघृर्ण खून प्रकरणात माणगांव पोलिसांनी यशस्वी तपास करीत पहिला आरोपी अटक केला आहे.गावातीलच 22 वर्षीय नराधम तरुणाने हे कृत्य केल्याने सर्व अफवांना पुर्णविराम मिळाला आहे. येत्या दोन दिवसातच पुर्ण खुन प्रकरणावरील पुर्ण पडदा दुर होऊन इतर आरोपी पकडण्यात माणगांव पोलिस यशस्वी होतील असा विश्वास निर्माण झाला आहे.

माणगांव तालुक्यातील वावे येथील कु. दिया जयेंद्र जाईलकर ही दि. 25 मे 2018 रोजी बेपत्ता झाली होती. बेपत्ता झाल्यानंतर दि. 28 मे 2018 रोजी चार दिवसांनी तिचा मृतदेह घरापासून जवळच 100 मीटर अंतरावरील पडक्या घरात कुजलेल्या स्थितीत सापडला होता. कु. दिया हिचा मृतदेह सापडल्यानंतर संपुर्ण माणगांव तालुक्यातील वातावरण अत्यंत संतप्त झाले होते. चिमुकल्या दियाला न्याय मिळवून देण्यासाठी ठिकठिकाणी कडकडीत बंद, मुक मोर्चे काढून व आरोपीचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला होता.

कु. दिया बेपत्ता झाल्यापासून माणगांव पोलिस ठाण्याचे कर्मचारी न थकता न झोपता रात्रीचा दिवस करीत तपास करीत होते. परंतू पोलिस यंत्रणेच्या हाती काहीही लागत नव्हते. या प्रकरणी पोलिसांनी दहा ते बारा संशयितांची धरपकड करीत चौकशी केली. आरोपी मिळत नसल्यामुळे माणगांवमधील जनमानस अत्यंत संतप्त झाले होते. विविध संस्था संघटना मोर्चा, आंदोलनाची तयारी करीत होत्या. आणि अखेर चौथ्या दिवशी वावे येथील सुरज सहादेव करकरे या 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याने दियाची हत्या केल्याची कबुली पोलिस जबानीत दिली. हत्येचे कारण अद्याप सांगितले नसल्याने या खुनाचा पुर्णपणे उलगडा झालेला नाही.

अजुनही पाच ते सात संशयितांची चौकशी सुरु असून लवकरच घटनेतील सर्व आरोपी जेरबंद होतील असा विश्वास पोलिसांनी बोलून दाखवला आहे. या प्रकरणी माणगांव पोलिस ठाण्यात गु.र.नं. 89/2018 भादविसं कलम 363, 302, 201 प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांवचे उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता नलावडे करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.