माणगांवात मराठा आरक्षणासाठी मुंबई-गोवा महामार्ग रोखला; जोरदार शक्तीप्रदर्शन

माणगांव : प्रवीण गोरेगांवकर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी 9 ऑगस्ट क्रांतीदिनी माणगांवमध्ये मराठा समाजाने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.  यावेळी माणगांव बसस्थानकासमोर आंदोलकांनी तब्बल दोन तास महामार्ग रोखून धरीत रस्त्यावरच ठिय्या मांडला. शासनाच्या तीव्र धिक्कार करीत आंदोलकांनी आपल्या मागणीचा पुनर्उच्चार करीत जोरदार घोषणाबाजी केली. तालुक्यातील इंदापूर, निजामपुर, माणगांव, लोणेरे, गोरेगांव या प्रमुख शहरात स्वयंस्फुर्त कडकडीत बंद पाळण्यात आला होता. जीवनावश्यक सेवा वगळता सर्व सेवा ठप्प होत्या.

माणगांवमध्ये सकाळपासूनच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जमण्यास सुरुवात झाली. जून्या पंचायत समितीच्या आवारात हजारो समाजबांधव जमा झाले. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता जुन्या पंचायत समितीतून मुंबई गोवा महामार्गाने निजामपूर फाटा येथे मोर्चाने जात पोलिस चौकीसमोर ठिय्या आंदोलन करीत तब्बल दोन तास रस्ता रोको केले. रास्ता रोको करणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर समाजातील प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन करतांना, मराठा समाजाला  आरक्षण मिळावे या मागणीसाठी संपुर्ण राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. मागील अनेक वर्ष आरक्षण मिळावे म्हणून सनदशीर मार्गाने शासनाला निवेदने देत मागणी केली जात आहे. परंतू मराठा समाजाला अजूनही आरक्षण मिळालेले नाही. आमच्या मागणीकडे सर्वांनीच सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मराठा समाजात तीव्र असंतोष पसरला असून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सनदशीर मार्गाने आपला लढा सुरुच राहिल असा ठाम निर्धार करीत आंदोलक नेत्यांनी जोरदार भाषणे केली. दोन तास सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनात घोषणाबाजीबरोबरच वेगवेगळी स्फुर्तीगीते, पोवाडे याने परिसर दणाणून गेला होता.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने सर्वांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आदल्या दिवशीच केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत अत्यावश्यक सेवा वगळून सर्व सेवा ठप्प होत्या. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शाळा महाविद्यालयेदेखील बंद होती. व्यापारी बांधवांनी स्वत: हून बाजारपेठ बंद ठेवली होती. प्रवासी व नागरीकांना बंदची कल्पना असल्यामुळे किरकोळ गैरसोय वगळता बंद शांततेत पार पडला. महामार्गावर तुरळक वाहतुक सुरु होती. एस.टी. महामंडळाच्या बसही बंद ठेवण्यात आल्या होत्या. माणगांव येथील रास्ता रोको आंदोलन शांततेत पार पडले. आंदोलन कर्त्यांकडून कार्यकर्त्यांना आयोजक शांततेत हे आंदोलन करावे अशा सुचना वेळोवेळी देत होते. त्याचबरोबर कोणीही मोर्चाचे नियम तोडू नयेत अशा सुचनाही वेळोवेळी दिल्या जात होत्या त्यामुळे हा मोर्चा शांततेत परंतू शासनाच्या धोरणाचा धिक्कार करीत पार पडला.

दरम्यानच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून माणगांव उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांवचे पोलिस निरिक्षक विक्रम जगताप यांनी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवला होता. यामध्ये 10 अधिकारी, 100 पोलिस कर्मचारी, दंगल नियंत्रण पथक, तैनात करण्यात आले होते. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी व्हिडीओ रेकॉर्डींग व ड्रोन कॅमेऱ्याचाहा वापर करण्यात आला होता. रुग्णवाहीकाची व्यवस्था पोलिसांमार्फत करण्यात आली होती.

ठिय्या आंदोलन व मोर्चात सकल मराठा समाजाचे प्रमोद घोसाळकर, राजीव साबळे, माणगांव नगराध्यक्षा योगिता चव्हाण, आनंद यादव, राजू मोरे, विष्णु सावंत, गजानन अधिकारी, डि.एम. जाधव, अनिल मोकाशी, वैभव साबळे, संजय घाग, सुरेश वाघ, गणेश चव्हाण, प्रमोद देशमुख, सुनिलदत्त चव्हाण, विलास सुर्वे, मंगेश सावंत, महादेव कनोजे, प्रसाद जाधव, भिकू शिर्के, लक्ष्मण महाळुंगे, नितीन पवार, तुषार बगडे, महेंद्र दळवी, शिवाजी घाग, शरद सावंत, बाबू पोळेकर, सायली दळवी, अवंतिका गायकवाड, अपुर्वा खानविलकर, तेजश्री गायकवाड, श्रेया शिंदे आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह हजारोंच्या संख्येने मराठा समाजबांधव सहभागी झाले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत