माणगांव नगराध्यक्षपदाची निवडणूक 24 जुलैला

माणगांव : प्रवीण गोरेगांवकर

रायगड जिल्ह्यात राजकीयदृष्ठ्या महत्व प्राप्त झालेल्या माणगांव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची मुदत 25 जुलै 2018 रोजी संपत असल्याने नविन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक मंगळवार दि. 24 जुलै 2018 रोजी जाहिर झाली आहे. या निवडणूकीचा कार्यक्रम रायगड़ जिल्हाधिकारी यांनी जाहिर केला. यावेळी माणगांवची धुरा कोणाच्या खांद्यावर दिली जाते याची उत्सुकता माणगांवकरांना लागली आहे.  

माणगांव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी 2016 मध्ये झाली होती. ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत झाल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 17 पैकी 11 जागांवर विजय मिळवित नगरपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली होती. पक्षश्रेष्ठी आ. सुनिल तटकरे यांनी पहिल्या अडीच वर्षांकरिता आनंद यादव यांना नगराध्यक्षपदी संधी दिली.

अडीच वर्षानंतर शासननिर्णयाप्रमाणे पुन्हा निवडणूक घेण्यात येणार असून यावेळी सर्वसाधारण महिला आरक्षण पडले असल्याने सौ. भाग्यश्री यादव, सौ. रिया उभारे, सौ. स्नेहा दसवते, सौ. निलम मेहता व सौ. शुभांगी जाधव या पाच नगरसेविकांची नांवे चर्चेत असल्याचे समजते. नगराध्यक्ष पदासाठी दि. 18 व 19 जुलै 2018 रोजी सकाळी 10 ते 2 यावेळेत नामनिर्देश अर्ज सादर करणे, 19 जुलै रोजी दुपारी 2 वा. नंतर छाननी, 23 जुलै रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज मागे घेणे, 24 मे रोजी निवडणूक व दुपारी 1.0 वाजता निकाल जाहिर करणे असा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच यादिवशी उपनगराध्यक्ष पदाचीही निवडणूक घेण्यात येणार आहे. य़ापदासाठी 24 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 वा. नामनिर्देशन अर्ज सादर करणे, त्यानंतर छाननी व त्याचवेळी त्याचठिकाणी उपनगराध्यक्षपदाचीही निवडणूक घेण्यात येणार आहे.  उपनगराध्यक्ष पदासाठी विद्यमान उपनगराध्यक्ष संदिप खरंगटे यांनाच ठरल्याप्रमाणे पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत