माणगावातील 480 घरांत उज्वला योजना

माणगाव : प्रवीण गोरेगांवकर

केंद्र सरकारच्या ग्राम स्वराज मोहिमेंतर्गत उज्वला योजनेतून माणगाव तालुक्यात भाजप तर्फे आतापर्यंत 480 गरजू ग्राहकांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले आहे. माणगाव नगर पंचायत हद्दीतील उतेखोल आदिवासीवाडी येथील लाभार्थ्यांना 2 जुलै रोजी गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुका भाजपचे अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी शासनाच्या उज्वला गॅस योजनेची माहिती दिली.

माणगावातील 480 घरांत उज्वला योजना

पुर्वी घरातील पुरुष जंगलात जाऊन लाकडे तोडायचे व स्त्रीया वाहतुक करून त्या मोळ्या घरी घेऊन यायच्या. त्यावेळच्या जेवणाला वेगळीच चव असते मात्र सर्वसामान्य स्त्रीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असे. चुलीवरचे जेवण करतांना होणाऱ्या धुरामुळे भांडी काळवंडायची, महिलांना आरोग्याचा त्रास व्हायचा. या महिलांचा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने हा उपक्रम राबविला आहे. या योजनेंतर्गत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ कसा पोहोचेल याची सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी केले.

ग्राम स्वराज्य मोहिमे अंतर्गत उज्वला योजनेचा शुभारंभ 1 मे 2016 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते बलिया उत्तरप्रदेश, येथे केला गेला, या योजनेअंतर्गत आज भारतातल्या 3. 5 कोटी महिलांची धुरापासून सुटका करीत त्यांच्या जीवनाला एक नवा प्रकाश, नवीन ऊर्जा आणि नवी क्षितिजे देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. भारत सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजनेला अधिक विस्तृत करीत तिचे उद्दिष्ट वाढवून 8 कोटी केले आहे. अनुसूचित जाती, जमाती, अंत्योदय तसेच ज्या महिला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, अति-मागासवर्ग,वनवासी, अशा सात श्रेणीतील बीपीएल कुटुंबातल्या असतील त्यादेखील आता विस्तारित उज्ज्वला योजनेत अर्ज करू शकतात अशी माहिती ढवळे यांनी दिली.

या वेळी माणगाव तालुका समन्वय समिती अध्यक्ष नाना महाले, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष यशोधरा गोडबोले, तालुका उपाध्यक्ष योगेश सुळे, विस्तारक वसंत सुतार, अशोक यादव, संजय सावंत, बाबुराव चव्हाण, प्रकाश पवार, संजय चव्हाण, नीलम काळे, दत्ता नाईक आदी उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत