माणगाव हत्या आणि आत्महत्याने हादरले!

खरवली येथे हत्या तर इंदापुर गौळवाडी येथे आत्महत्या

माणगांव : प्रवीण गोरेगांवकर

माणगांव तालुक्यात एकाच दिवशी हत्या व आत्महत्या झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. खरवली येथील आपल्या बहिणीची छेड काढतो या रागातून एका 26 वर्षीय तरुणाची भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे तर इंदापूरनजीक गौळवाडी येथे आजाराला कंटाळून एका 47 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

माणगांव पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मौजे खरवली, ता. माणगांव येथील मयत तरुण विशाल श्रीपत जुमारे (26) रा. खरवली हा आपल्या बहीणीची छेड़ काढतो याचा राग आरोपी सौरभला होता. दोन दिवसापूर्वी आरोपी व मयत यांच्यामध्ये याच विषयावरून हाणामारीदेखील झाली होती. हा वाद गावपातळीवर मिटवण्यात आली होती. दि. 11 ऑगस्ट रोजी मयत विशाल जुमारे व त्याचे मित्र खरवली गावात घटनास्थळी पार्टी करत बसलेले असतांना आरोपीने त्या ठिकाणी येऊन पुन्हा शिवीगाळी केली व सोबत आणलेल्या चाकुने मयताला भोसकले.  त्याची निर्घृण हत्या करीत आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. आरोपीविरोधात भादविस कलम 302 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान माणगांवमध्ये हत्येचे सत्र सतत सुरुच असून आठ वर्षीय दिया जाईलकर, परिचारिका अरुणा  उभारे यांच्या हत्याकांडापाठोपाठ गेल्या चार महिन्यातील तिसरी घटना घडली आहे.

दुसऱ्या घटनेत माणगांव तालुक्यातील गौळवाडी इंदापूर येथील मयत इसम मनोहर धोंडु कासार (47) रा. गौळवाडी, इंदापूर यांना मागील दहा वर्षांपासून मुळव्याधीचा दुर्धर आजार होता. चार वेळा शस्त्रक्रिया होऊनदेखील हा आजार त्याची पाठ सोडत नसल्याने ते त्रस्त झाले होते. या आजाराला आपण कंटाळून निघुन जात असल्याच्या आशयाची चिठ्ठी घरात लिहून ठेवून ते 11 ऑगस्ट रोजी घराबाहेर पडले होते. ते घरी न आल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार माणगांव पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. यानंतर खबर देणार व शेजारील मंडळी तसेच गावचे पोलिस पाटील अनंत गुणाजी नवगणे यांनी जंगलभागात नदीपात्राकडे शोध घेतला असता मनोहर कासार यांचा मृतदेह उंबराच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळून आला. घटनेची नोंद माणगांवपोलिस ठाण्यात अ.मृ.र. नं. 39/2018 सीआरपीसी 174 प्रमाणे दाखल करण्यात आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत