मातृदिन विशेष : भाजी विकून मुलीला बनविले अधिकारी

मुलांच्या शिक्षणासाठी सुरेखा मस्के यांनी घेतले अपार कष्ट

सातारा : रायगड माझा 

शिक्षण वाघिणीचे दूध आहे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ऐकून प्रभावित झालेल्या साताऱ्यातील आईने गेली 21 वर्ष अपार कष्ट घेत भाजी विकून आपल्या मुलांना शिक्षण दिले. मुलांनी ही आईच्या कष्टाचे चीज केले. नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला आणि निकालात मुलीने सहावा क्रमांक प्राप्त करून आईच्या कष्टाचे मोल जपले असल्याची आदर्शदायी घटना साताऱ्यात घडली आहे. 

साताऱ्यातील गोडोली परिसरातील सुरेखा विलास मस्के यांनी सन 2002 मध्ये पतीचे निधन झाल्यानंतर मुलगा सचिन व मुलगी स्नेहा यांच्या पालन पोषणासह दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी अपार कष्ट करून पार पाडली व अद्याप पार पाडत आहेत.गेल्या 20 वर्षपासून त्या साताऱ्यातील पोवई नाका परिसरातील समर्थ भाजी मंडईत सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत भाजी विकत आहेत. विक्री व्यवसायातून त्यांनी सचिनचे बी.ए.इंग्लिश पर्यंत शिक्षण पूर्ण केले. सचिन सध्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करीत आहे. तर मुलगी स्नेहा हिचे एम. एस.सी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. स्नेहाने पुढे जाऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि मुलीने आईच्या अपार कष्टाचे फलित करत राज्यात सहावा क्रमांक पटकावला. नगरपालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेली मुलगी आईने घेतलेल्या कष्टाच्या जोरावर आता मंत्रालयात लिपिक पदावर सन्मानाने रुजू होणार आहे. साहजिकच मुलीने रात्रं दिवस अभ्यास करून आईचे नाव मातृदिनाच्या पार्श्वभूमीवर उज्वल केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत