माथेरानच्या नगरसेवकांनी ठोकले नगरपालिकेला टाळे; स्थानिकांनी केला निषेध

माथेरान : मुकुंद रांजाणे 

माथेरानमध्ये अतिवृष्टी होत आहे, रस्ते खचून चिखलाचे साम्राज्य पसरलं आहे तर काही ठिकाणी झाडांची पडझड होत आहे,असे असताना माथेरानचे मुख्याधिकारी सागर घोलप हे गेली सात दिवस माथेरान मध्येच आले नाहीत. त्यामुळे आपला रोष दर्शविण्यासाठी माथेरानकरांनी मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात एक अनोखे आंदोलन केले. त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या खुर्चीची पुजा आणि पुप्षहार घालुन नगरपरिषद कार्यालयाला टाळे ठोकले.

गेल्या अनेक दिवसांपासून माथेरानमध्ये लोकप्रतिनिधी विरुद्ध मुख्याधिकारी संघर्ष शिगेला पोहचलाय. त्यामुळे लागोपाठ सात दिवस गैरहजर राहणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करण्यासाठी लोकप्रतिनिधी नगरपरिषदेत कार्यालयात गेले होते. मात्र नगरपरिषद कार्यालयात अधिकारी तर सोडाच पण एकही कर्मचारीसुद्धा उपस्थित नव्हता. त्यामुळे आपल्या समस्यांची विचारणा करणार कोणाकडे? असा प्रश्न पडल्यानंतर स्थानिकांचा रोष अनावर झाला.आणि त्यांनी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रिकाम्या असलेल्या खुर्चीला आरती करून हार घातला. मुख्याधिकारी यांच्या कार्यशैलीविषयी लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी आहे. त्यांच्याविषयी अनेक तक्रारी वरिष्ठ स्तरावर देखील करण्यात आल्या आहेत. परंतु या तक्रारींची दाखल घेतली जात नसल्याचाही लोकप्रतिनिधींमध्ये संताप आहे. त्यातच पावसाळ्यातील आपत्कालीन स्थिती मध्ये नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याची लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.

 

पावसाळ्यात अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. काही ठिकाणी झाडांची तसेच सार्वजनिक शौचालयांची पडझड झाली आहे. शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे या सर्व गैरव्यवस्थेला मुख्याधिकारी आणि प्रशासन जबाबदार असल्याचा लोकप्रतिनिधींचा आरोप आहे. या सर्व तक्रारींची दाखल घेण्यासाठी नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी उपस्थित नसतात अशी देखील लोकप्रतिनिधींची व्यथा आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यशैलीमुळे जेरीस आलेल्या लोकप्रतिनिधींनी थेट नगरपालिकेला टाळे ठोकले.

दरम्यान या आंदोलनाची माहिती पोलिसांना मिळताच माथेरानचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी पालिकेत धाव घेतली. या सर्व प्रकाराची माहिती फोन वरून जिल्हाधिकारी कार्यालयाला त्यांनी माहिती दिली. नगरपालिकेतून आंदोलनकर्ते परतत असताना मुख्याधिकारी रस्त्यात भेटले असता स्थानिकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. माथेरानमध्ये इतक्या विचित्र घटना घडत आहेत पण पालिकेत आपत्कालीन व्यवस्था कोलमडून पडली आहे. याच्यावर देखरेख ठेवणार कोण आहे? असेच जर होत राहिले तर पुन्हा गांधीगिरी पद्धतीने काळी शाही आणि चपला देऊन मुख्याधिकाऱ्यांचा सन्मान करू असे माथेरान मधील स्थानिक नितीन सावंत यांनी मुख्याधिकाऱ्यांना खडसावले.

सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन केलेल्या या आंदोलनाच्या वेळी गटनेते प्रसाद सावंत, विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे, महिला नगरसेविका सुषमा जाधव, सोनम दाभेकर, प्रियांका कदम,ज्योती सोनवणे, नगरसेवक शकील पटेल,नरेश काळे उपस्थित होते.

गेल्या पावणेदोन वर्षांपासून माथेरान मध्ये लोकप्रतिनिधी विरुद्ध मुख्याधिकारी असा संघर्ष सुरु आहे. या संघर्षाचे मूळ कशात आहे हे जरी स्पष्ट होत नसले तरी यामुळे माथेरानच्या विकासाला खीळ बसली आहे हे मात्र नक्की!

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत