माथेरानच्या बायोगॅस प्रकल्पाला जनरेटरचे ग्रहण ! 

माथेरान : मुकुंद रांजाणे 
माथेरामध्ये एक सेवाभावी उपक्रम शहरात मार्गी लागावा या दूरदृष्टीने २००७ मध्ये नगरपालिका आवारात बायोगॅस प्रकल्प तत्कालीन नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी पाठपुरावा केल्यावर जेष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सुरू करण्यात आला आहे.या बायोगॅस मध्ये गावातील सर्व ओला कचरा गोळा करून टाकण्यात येत आहे.याच गॅसच्या निर्मिती मधून गावातील मुख्य रस्त्यावर स्ट्रीट लाईट अनेक महिन्यांपासूनच सुरू होती. त्यामुळे वीज वितरण कंपनी कडून वीज न घेता याच माध्यमातून रस्त्यावर स्ट्रीट लाईट करिता विजेचा वापर केला जात होता यातून नगरपालिकेच्या आर्थिक बचतीसाठी मदत केली जात होती. परंतु मागील सहा महिन्यांपासून हा प्रकल्प सुरू असतांनाच केवळ जनरेटर बंद असल्याने स्ट्रीट लाईट बंद आहे.
जनरेटरच्या तांत्रिक बिघाडापायी या शुल्लक कारणांचा नाहक त्रास रस्त्यावर लाईट नसल्याने सुट्टयांच्या हंगामात पर्यटकांना तसेच स्थानिकांना रात्री अपरात्री पायी प्रवास करताना होत आहे. नियमितपणे जवळपास तीन ते चार सिलेंडर इतका गॅस या प्रकल्पातून निर्माण होत आहे.परंतु याचा वापर केला जात नाही.साठणारा गॅस नाईलाजास्तव हवेत सोडून द्यावा लागतो आहे. गॅसचा बलून पूर्ण भरत आहे त्यामुळे जर याकडे दुर्लक्ष झाल्यास स्फोट होऊन मोठया प्रमाणात जवळपास असलेल्या हॉटेल तसेच धार्मिक स्थळाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याकामी विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी एकूण तीन वेळा मुख्याधिकारी सागर घोलप यांना लेखी कळवून सुद्धा त्यांनी सदर बाबतीत कानाडोळा केलेला आहे.अनेकदा सभागृहात याबाबतीत विचार विनिमय करण्यात आला आहे परंतु जनरेटर च्या नादुरुस्तीचे शुल्लक कारण असतांना याकडे जाणीवपूर्वक मुख्याधिकारी सागर घोलप हे ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत स्वारस्य दाखवीत नाहीत.
——————————————————–
माथेरामध्ये यशस्वी झालेल्या या बायोगॅस प्रकल्पाला अनेक मंडळी भेटी देत असून आपापल्या क्षेत्रात असेच बायोगॅस प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.देश विदेशातील पर्यटक देखील आवर्जून इथे देत आहेत. परंतु जनरेटर बंदचे कारण पुढे करून मुख्याधिकारी हेतुपुरस्सर चालढकल करीत आहेत. ह्या बायोगॅस मधून स्ट्रीट लाईट साठी उपयोग होत आहे परंतु सध्या लाईट बंद असल्याने नगरपालिकेचे यातून आर्थिकदृष्ट्या नुकसान होत आहे याला सर्वस्वी जबाबदार हे मुख्याधिकारी आहेत.
प्रेरणा सावंत – नगराध्यक्षा माथेरान नगरपालिका
माथेरानच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्याधिकारी हे तत्परता दर्शवित नाहीत त्यामुळे एवढा महत्वाकांक्षी बायोगॅस प्रकल्प जनरेटर बंदच्या शुल्लक कारणावरून स्ट्रीट लाईट पुरविण्यासाठी उपयोगात येत नाही.याला अपवाद हे मुख्याधिकारी सागर घोलप आहेत त्यांची या प्रकल्पाबाबत मानसिकता दिसत नाही.
शिवाजी शिंदे — विरोधी पक्ष नेते माथेरान नगरपालिका
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत