माथेरानच्या रस्त्यांना क्ले पेव्हर ब्लॉक शिवाय पर्याय नाही

माथेरान : मुकुंद रांजाणे 

दरवर्षी पावसाळ्यात केवळ रस्त्यांच्या डागडुजी आणि दुरुस्ती साठी दगडमातीच्या  बंधाऱ्याच्या साहाय्याने रस्त्यांची होणारी पावसाळी धूप थांबविण्यासाठी बंधारे टाकून पाण्याचा प्रवाह गटारांमार्फत वळविण्यात येतो. परंतु दरवर्षी टाकण्यात आलेले बंधारे सुयोग्य ठिकाणी न टाकल्यामुळे रस्त्यांची वाताहत होऊन हेच ब्रिटिशकालीन रस्ते नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहेत.यामध्ये नगरपालिकेला मोठया प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.माथेरानच्या मातीची होणारी धूप थांबविण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा म्हणूनच क्ले पेव्हर ब्लॉक शिवाय पर्याय उरलेला नाही असे मत स्थानिक मंडळी व्यक्त करीत आहेत.दरवेळेस पावसाळ्यात बंधाऱ्याची कामे निकृष्ठ दर्जाचीच होत असतात कारण पावसाचे प्रमाण अधिक असते. आणि होणाऱ्या कामांकडे विशेष म्हणजे सर्वच लोकप्रतिनिधीनी डोळेझाक केल्यामुळे यामध्ये काय गौडबंगाल आहे असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
कुणाच्या मते माथेरानचे रस्ते शंभर टक्के क्ले ब्लॉकचे झाले पाहिजेत व पर्यावरणाचा ऱ्हास थांबला पाहिजे. जंगलातून खड्डे खणून माती रस्त्यावर रेड कार्पेट प्रमाणे टाकली जाते व पावसाळ्यात ती वाहून जाते हे दृष्ट चक्र थांबले पाहिजे.असेही म्हंटल जात आहे तर कुणी राजकारणी रस्त्यांची धूप होऊ नये यासाठी इथली माती वाचली पाहिजे त्यासाठी ठोस कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. परंतु जेव्हा या कामांच्या निविदा काढल्या जातात त्यावेळेस सर्वच लोकप्रतिनिधी आंधळ्याचे ढोंग घेतात की काय असाही सवाल सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात बंधाऱ्याची कामे केली जातात आणि पूर्वीपासून इथे दगडामातीच्या साहाय्याने बंधारे टाकून रस्त्यांची धूप कमी केली जाते. आणि ऐनवेळेस जेव्हा ही निकृष्ट दर्जाची होत असलेली कामे स्वतः लोकप्रतिनिधी डोळ्याने पाहून सुद्धा सदरच्या बाबतीत तक्रार करताना दिसत नाहीत हे देखील एकन सुटणारे कोडेच बनले आहे. सर्वच लोकप्रतिनिधी हे ठेकेदाराला पाठीशी घालून कामे उरकण्यासाठी घाई करीत आहेत अन नगरपालिकेच्या पैशाला गंगेत ढकलत आहेत असेही अप्रत्यक्षपणे ऐकावयास मिळत आहे.
माथेरान विषयी जर खरोखरच लोकप्रतिनिधीना आस्था,आपुलकी, प्रेम आणि नागरिकांच्या पैशांची कदर असेल तर त्यांनी गावाची कुठलीही होत असलेली विकास कामे जातीने लक्ष केंद्रित करून कामे अधिकाकाळ कशी टिकतील आणि नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होणार नाही याकडे गांभीर्याने लक्ष देणे सुद्धा आवश्यक आहे. पण आजपर्यंत माथेरान मध्ये सर्वच बाबतीत उलट पहावयास मिळत आहे. कुठल्याही सत्ताधारी गटाने कामे सुरू केली की त्यास आडकाठी आणली जाते. याचा अनुभव मागील काळात मुख्य रस्त्यावर पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनविताना नागरिकांना आलेला आहेच.त्यावेळेस  रस्ते पेव्हर ब्लॉकचे बनविताना आक्षेप घेतल्या मुळेच त्यावेळेसच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी ठराविक लोकांच्या मतांसाठी राजकारण केले नसते तर आज ही वेळ आलीच नसती तेव्हापासून आजपर्यंत नगरपालिकेत कुणाचीही सत्ता येवो कामे करतांनाच खूपच अडचणी निर्माण होत असतात.
यावेळेस अनेक कामे प्रलंबित आहेत. प्रशासकीय अधिकारी सुद्धा कामे पूर्ण करण्यासाठी पूर्ण सहयोग देत नसल्याने गावाचा विकास मागे पडला आहे.त्यातच आजवर माथेरानच्या राजकारणात खंबीरपणे नेतृत्व गावाला लाभलेले नाही.एखाद दुसरा अपवाद वगळता आजपर्यंत बालिश बुद्धीच्या मंडळींनी केवळ निवडणुकीत आपल्या पक्षाची सत्ता स्थापन करण्यासाठी खटाटोप केल्याचे निदर्शनास आले आहे. एरव्ही विरोधात जाणाऱ्या मंडळींनी सभागृहात निकृष्ठ कामांवर आक्षेप घेणे गरजेचे असते तसे होत नाही.आणि एकहाती सत्तेपुढे कुणाचेही शहाणपण चालत नाही हेही तितकेच खरे आहे.कामे करताना एकत्रितपणे गावाचा विकास करणे तितकेच महत्वाचे आहे. परंतु एखादा मुख्याधिकारी निगरगट्ट असेल आणि कामे पूर्ण करण्यासाठी असमर्थता दर्शवित असेलच तर त्यासाठी वेळप्रसंगी आपल्या वरिष्ठांकडे अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या विरोधात स्वतःच्या पदांचे राजीनामे देऊन शासनाला तसेच पक्ष श्रेष्ठीन्ना जागरूक करणे सुद्धा अधिक आवश्यक आहे.
माथेरान मध्ये एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी गटनेते प्रसाद सावंत यांनी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच प्रयत्न केले आहेत. प्रसाद सावंत यांच्या विश्वासावर जनतेसह पक्षाची मदार अवलंबून आहे. अधिकारी वर्गाच्या गलथानपणामुळे कामे पूर्ण होण्यासाठी विलंब होत आह.सर्वच मतदार  नागरिक प्रत्येक सत्ताधारी गटाकडे आशेने,आस्थेने पहात आहेत. त्यांचा भ्रमनिरास होऊ नये यासाठी निदान सत्ताधारी लोकप्रतिनिधीनी काहीतरी ठोस उपाययोजना करून या लहानशा गावाला विकासाकडे नेण्यासाठी हातभार लावावा असे नागरिक बोलत आहेत.इथे छोट्या छोट्याशा कामांत  अप्रत्यक्षपणे निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी सुद्धा दरवेळेस गलिच्छ राजकारण खेळले जात असते.त्याचा एकंदरीत परिणाम पर्यटनावर होतांना दिसत आहे.आगामी काळात सत्ताधारी गटाने सावधतेने आणि संयमाने कामे करण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही सुज्ञ नागरिक बोलत आहेत.
१५० वर्षांचे हे दृष्टचक्र संपायला हवे. काळानुसार बदललो नाही तर रस्ते नामशेष होण्याचाच धोका जास्त आहे. माथेरान वाचवायच असेल तर माती वाचली पाहीजे. *संवर्धन* हाच इथल्या विकासाचा मंत्र असला पाहीजे. सिमेंट काॅंक्रिटची कामे, इमारत बांधणे म्हणजे विकास नाही हे आता सर्वांनी ध्यानात घ्यायला हव. वाढती अतिक्रमणे आणि कमी कष्टात अनधिकृत धंद्यांकडे वाढणारा कल लक्षात घेता हे हिलस्टेशन टिकवणे हे फार मोठ आव्हान आहे. त्यामुळे येणार्‍या काळात जास्तीत जास्त रस्ते क्ले पेव्हरचे करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी जमीनीची धुप नियंत्रणात ठेवता येईल.
मनोज खेडकर — माजी नगराध्यक्ष माथेरान
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत