माथेरानच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

टपऱ्यावर तात्पुरती कारवाई; व्यापारी वर्गात समाधान

माथेरान : मुकुंद रांजाणे

दोन दशकांपूर्वी येथील विविध ठिकाणी राजकीय वरदहस्तानेआणि केवळ मतांच्या राजकारणापायी अनेकांनी आपली दुकाने रस्त्यावर थाटली असून याचा नाहक त्रास पायी प्रवास करणाऱ्या पादचार्याना नेहमीच सहन करावा लागत आहे.या रस्त्यावरील दुकानदारांमुळे व्यापारी वर्गाच्या व्यवसायावर मोठया प्रमाणात परिणाम होत आहे यासाठी त्यांच्या तक्रारी अर्जाची दखल घेऊन नगरपालिका कामगारांनी मुख्याधिकारी सागर घोलप यांच्या गैरहजेरीत पोलीस बंदोबस्तात कारवाईची धडक मोहीम आज दि.४ मे रोजी सकाळी अकरा वाजता राबवली.त्यामुळे सर्व फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या लोकांची त्रेधातिरपीट उडाली.
फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी आपल्या दुकानांचा पसारा देखील मोठ्या प्रमाणात वाढविलेला असून नौरोजी उद्यान परिसरात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातच ज्या मोठया दुकानदारांची स्वताची दुकाने आहेत ते सुद्धा जागा अडवून फुटपाथवर व्यवसाय करत आहेत. यांच्या मुळे जे खरोखरच गरजवंत आहेत अशा सर्वसामान्य लोकांची यामुळे गोची होत आहे.यापूर्वी सुद्धा अनेकदा अशाप्रकारे कारवाया करण्यात आलेल्या आहेत. परंतु हे सर्व क्षणिक असते. पुन्हा ये रे माझ्या मागल्याअशीच परिस्थिती असते.१९९६ च्या दरम्यान समाजकल्याण विभागा मार्फत सात ते आठ जणांना गटाई काम करण्यासाठी टपऱ्या देण्यात आल्या होत्या परंतु ते गटाई काम सहसा करीत नाहीत त्यामुळे पर्यटकांना खूपच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. माथेरानच्या या फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या गरजू लोकांसाठी निदान नगरपालिका प्रशासनाने एखादया ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यास हा प्रश्न मार्गी लागू शकतो. मे महिना हा वार्षिक व्यवसायाचा हंगाम असून जर अशा लोकांचा व्यवसाय हिरावून घेतलातर त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.यासाठी साधकबाधक निर्णय घेणे आवश्यकआहे त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडपासून  रेल्वे स्टेशन ते मुख्य बाजारपेठ या भागातील संपूर्ण दुर्गंधी दूर करण्यासाठी रस्ता पूर्णतः साफ,मोकळा करावा जेणेकरून पर्यटकांना पायी प्रवास करण्यासाठी अडचणी येणार नाहीत.यासाठी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने जागरूक राहणे महत्वाचे आहे असे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
या कारवाई वेळी नगरपालिका वरिष्ठ लिपिक रत्नदीप प्रधान, राजेश रांजणे, लेखापाल राजेंद्र पाटील, नरेंद्र धनावडे, चंद्रकांत शेटे, अन्सार महापुळे यांसह पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर ,पोलीस कर्मचारी तसेच नगरपालिका कामगार उपस्थित होते.
माथेरान हे बिनशेती पर्यटनक्षेत्र असून स्वताची दुकाने नसल्यामुळे रस्त्यावर भर उन्हातान्हात चिल्यापाल्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी व्यवसाय करावा लागत आहे.जवळपास चाळीस वर्षांपासून आम्ही येथे रहात आहोत यासाठी नगरपालिका लोकप्रतिनिधीनी काहीतरी सुयोग्य तजवीज करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा.अन्यथा आम्हाला कुटुंबाला उपाशीपोटी रहावे लागेल
शंकर तांबे, फुटपाथ व्यावसायिक माथेरान
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत