माथेरानच्या विकासात भाजपाचा खो

विकासकामात  पक्षीय राजकारण केले जात असल्याचा आरोप

 माथेरान : मुकुंद रांजाणे
राज्यात तसेच केंद्रात सुद्धा भारतीय जनता पक्षाची सत्ता प्रस्थापित असल्याने अन्य कुठेही स्थानिक पातळीवर भाजप व्यतिरिक्त अन्य दुसऱ्या पक्षांची स्थानिक स्वराज्य संस्थेत, ग्रामीण भागात सत्ता असेल तर त्यांच्या कामांत आडकाठी आणण्यास भाजप सरकार आणि त्यांचे नेते, मंत्री, आमदार, खासदार हे पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहे.राज्यात शिवसेना आणि भाजप अशी युतीची सत्ता प्रस्थापित असली तरीसुद्धा अंतर्गत मतभेदांमुळे विविध प्रकारच्या विकास कामांना गती प्राप्त होत नाही.भाजपच्या बहुतांश नेतेमंडळीकडे कुठल्याही प्रकारची समस्या घेऊन गेल्यास त्यांचा पहिला सवाल असतो की आपण कुठल्या पक्षाचे आहात. दुसऱ्या पक्षाचे नाव सांगितल्यास कामे करण्यासाठी वेळकाढू पणा करीत आहेत.आणि मुळातच भाजपवाल्यांना शिवसेनेच्या लोकांची कामेच करावयाची नसून केवळ भाजप एके भाजप असाच नारा त्यांच्या एकंदरीतच वागण्यावरून स्पष्टपणे दिसून येत आहे.
त्यामुळेच सध्या माथेरान सारख्या दुर्गम पर्यटनस्थळकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही.याचा स्वानुभव स्वतः माथेरानचे राजकीय लोक अनुभवत आहेत.भाजपला पुढील काळात सुद्धा राज्यात स्वतःची सत्ता कायमस्वरूपी अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी पक्ष बळकटी साठी ही मंडळी अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांना वेठीस धरण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. त्यातच या दुर्गम भागाच्या विकासाबाबत भाजप पक्षाला काहीएक स्वारस्य दिसत नाही. इथली जेनेतम मतदार संख्या आहे. त्यामुळे फारसे इकडे कुणीही राजकारणी लक्ष देत नाहीत. सध्यातरी सत्तेच्याच धुंदीत ही नेतेमंडळी आहेत.पक्ष विरहीत कामे अजिबातच करीत नाहीत. पक्षाचा अजेंडा फक्त यांना ठाऊक आहे त्यामुळे राज्यातील अनेक शहारांसह माथेरान सारखेच सुंदर ठिकाण भाजपच्या कुटील रणनीती मुळेच मागील दोन वर्षांपासून मागे पडले आहे.अनेक समस्यांबाबतीत विविध खात्यांच्या मंत्र्यांना तसेच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा प्रत्यक्षपणे भेटून इथल्या प्रामुख्याने भेडसावत असलेल्या अडचणी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उप नगराध्यक्ष आकाश चौधरी, गटनेते प्रसाद सावंत यांनी मांडलेल्या आहेत.निवेदने दिलेली आहेत. वाहतुकीच्या महत्वपूर्ण विषयावर सुद्धा चर्चासत्र केलेले आहे. इथला विकास आराखडा वीस वर्षानंतर सुध्दा नव्याने बनविण्यासाठी शासनाला वेळ नाही. १९९५ नंतरची सर्वच अनधिकृत बांधकामे अधिकृत करावीत अशी खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली आहे.तरी अद्याप येथील अनधिकृत घरे अधिकृत करण्यात आलेली नाहीत.कदाचित माथेरान हे पर्यटनस्थळ राज्यात आहे की नाही हेच त्यांना ठाऊक नसावे त्यामुळेच त्यांचा या गावाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे अशी चर्चा गावात ऐकावयास मिळत आहे.स्थानिकांनी स्वतःच्या गरजेपोटी बांधलेल्या निवाऱ्यावर हरित लवादाची टांगती तलवार आहे. स्थानिक भयभीत होऊन जीवन जगत आहेत.याचे काडीमात्र सोयरसुतक भाजप नेत्यांना दिसत नाही ही खरोखरच खेदाची बाब असल्याचे बोलले जात आहे. मुख्य कारण म्हणजे इथे नगरपरिषदेमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन करण्यात आली आहे.भाजपच्या एकाही उमेदवाराला आपले खाते उघडण्यासाठी अपयश पत्करावे लागले आहे.त्यामुळे भाजपचे कुणीही नगरपरिषद मध्ये सदस्य नसल्याने माथेरानचे विविध प्रश्न संबंधित मंत्री अथवा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे प्रश्न कथन केल्यास केवळ अशीच उत्तरे दिली जात आहेत.असेच जर ही भाजपची मंडळी वागली तर राज्यासह माथेरान सारख्या रमणीय स्थळाचा विकास मागे पडल्याशिवाय रहाणार नाही असे नागरिक बोलत आहेत.
  दोन वर्षात माथेरानचे एकही विकासात्मक काम पूर्ण झालेले नाही. नगरपरिषद मध्ये कार्यरत असलेले प्रशासकीय मुख्याधिकारी सागर घोलप यांच्यावर कामे करीत नसल्याने अनेकदा चौकशी झालेली आहे.त्यांच्या अकार्यक्षम कार्यप्रणाली मुळेच नुकताच दि.१६ जून रोजी सर्वच लोकप्रतिनिधींनी अविश्वास ठराव मंजूर केला होता. परंतु यासाठी सुद्धा सखोल बारकाईने घोलप यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही त्यांना पाठीशी घातले जात आहे. गावाची विकासकामे प्रलंबित असून या गावाला देण्यात येणारा शासकीय निधी सुद्धा हे मुख्याधिकारी वापरात आणण्यासाठी हतबल दिसत असून दलित वस्ती साठी आलेला निधी पुन्हा घोलप यांनी दलित वस्तीसाठी न वापरता शासनाकडे वर्ग केला होता.परंतु वरिष्ठांना विनंती केल्यावरून पुन्हा हा निधी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी आणलेला आहे. या मुख्याधिकार्याच्या पाठीशी भाजप नेत्यांचाच वरदहस्त आहे असेही नागरिकांमधून बोलले जात आहे. एकंदरीतच राज्यात भाजपचे अस्तित्व शाबूत आहे त्यामुळे जिल्हाधिकारी असो किंवा नगरविकास खाते असो यांच्या पुढे कुणाचेही प्रयत्न व्यर्थ जात आहेत. एकप्रकारे भाजपच्या वरिष्ठ पातळी पासूनच अन्य पक्षांची कोंडी केलेली दिसत आहे. सध्याचे मुख्याधिकारी सागर घोलप हे त्यांचा वैयक्तिक तीन वर्षांचा कार्यकाळ जून २०१९ मध्ये पूर्ण होऊन कदाचित त्यांची बदली होऊ शकते परंतु तोवर इथल्या शिवसेनेच्या सत्तेमुळे भाजप नेते आडकाठी आणत आहेत.इथली कामे पूर्ण करण्यासाठी हे गाव विकसनशील बनविण्यासाठी हातभार न लावता केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी संपूर्ण गावाला वेठीस धरत आहेत. भाजप सारखे एवढ्या खालच्या थराचे राजकारण आजवरच्या अन्य कुठल्याही पक्षाने केले नसल्याचे येथील वयोवृद्ध जाणकार मंडळी बोलत आहेत.
Attachments area
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत