माथेरानच्या समस्यांना मार्गी लावण्यासाठी मुख्याधिकारी रामदास कोकरे कटिबद्ध!

माथेरान : मुकुंद रांजाणे

कुठल्याही एखाद्या विशिष्ट ठिकाणी सकारात्मक दृष्ट्या पाऊले उचलल्यास अडचणीची कामे सुद्धा सुलभतेने पूर्णत्वास नेली जाऊ शकतात. यासाठी स्वतःचे मनोबल आणि कामे करण्याची जिज्ञासा अंगीकृत असावी लागते.ध्येयवादी मानसिकता आणि चिकाटीच्या बळावर अशक्य बाबी सहजपणे सोडविल्या जातात. याप्रमाणे माथेरान मध्ये नुकताच नव्याने मुख्याधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार स्वीकारलेले कार्यशील मुख्याधिकारी रामदास कोकरे हे कर्जत नगरपरिषद आणि माथेरान नगर परिषद या दोन्हीही महत्वपूर्ण ठिकाणांचा कारभार अगदी नेटाने पार पाडण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांच्या कुशल कार्यप्रणाली वरून स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे निदान कोकरे यांच्या कार्यकाळात तरी हे सुंदर पर्यटनस्थळ विकासाच्या दिशेने वाटचाल करेल अशी आशा स्थानिक नागरिक व्यक्त करीत असून त्यांनीच केवळ माथेरान नगर परिषदेचा एकमेव कार्यभार स्वीकारून प्रलंबित विकासकामे पूर्ण करावीत अशी मागणी सध्यातरी जोर धरू लागली आहे.

कर्जत नगर परिषदेचा पदभार करताना माथेरानच्या प्रलंबित प्रश्नांची उकल कशी लवकरात लवकर पूर्ण करून इथल्या पर्यटन शेतीवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या समस्यांना न्याय देता येईल याकडे मुख्याधिकारी कोकरे यांनी स्वतःला झोकून दिले आहे.हे त्यांच्या एकंदरीत कार्यपद्धती वरून स्पष्टपणे दिसून येत आहे.त्यामुळे अशीच प्रशासकीय यंत्रणा राबविणाऱ्या अधिकारी वर्गाची माथेरान सारख्या स्थळाला आज नितांत आवश्यकता आहे.

अल्पावधीतच त्यांनी इथल्या काही महत्वाच्या भागांना समक्ष भेटी देऊन पाहणी करून माहिती प्राप्त केली आहे. शैक्षणिक स्रोत असलेल्या नगर परिषद प्राथमिक शाळेसह शाळेतील शिक्षक वर्गाला तसेच शाळेच्या डागडुजी बाबतीत मुख्याध्यापक दिलीप अहिरे यांच्या कडून अद्ययावत माहिती घेऊन शाळेच्या सुधारणा बाबतीत निर्णय घेण्यात आला.
इथे मोठया प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असते यासाठी नगर परिषदेने पर्जन्यमापन उभारलेले आहे. त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. नौरोजी,आणि छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील दुरूस्ती देखभालीसाठी आवश्यक त्या उपाययोजना कामी पाहणी केली.एकमेव ग्रंथालय असलेल्या कर्सनदास मुळजी वाचनालय येथे असलेल्या ग्रंथ समूह तसेच पुस्तके, वाचक वर्ग याबाबतीत ग्रंथपाल चैताली मोरे यांच्या कडून माहिती घेतली.
देशातील नगर परिषदांमध्ये एकमेव प्रकल्प राबविला जात असलेल्या आकाश गंगा या महत्वाकांक्षी प्रकल्पाला भेट देऊन बाजूला असलेल्या पेमास्टर गार्डन अद्ययावत करण्याबाबत संबंधित अधिकारी वर्गाला सूचना दिल्या. मिनिट्रेन मधून प्लास्टिक तसेच काचेच्या बाटल्या वाहतूक करून यातून नगर परिषद साठी आर्थिक उत्पन्न कसे प्राप्त होईल याकामी नुकताच या मालाची वाहतूक सुरू केली आहे.
अत्यंत महत्त्वाचे म्हणजे इथे हॉटेल इंडस्ट्री असल्याने एस. टी.पी. प्लान प्रत्येक हॉटेल मध्ये उभारण्यात यावेत यासाठी हॉटेल धारकांची विशेष बैठक बोलावून सर्वांना ओला,सुका कचरा वेगवेगळ्या स्वरूपात संकलन करून तो घनकचरा कामगारांना देण्यात यावा अन्यथा कारवाई करण्यात येईल अशा सूचनाही मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिल्या आहेत.कमी वेळात कोकरे यांनी इथली भौगोलिक परिस्थिती जाणून घेतली आहे. लवकरच पेमास्टर पार्क आणि शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या कपाडिया मार्केट यांना गतवैभव प्राप्त करून देऊ असा दृढविश्वास त्यांनी प्रकट केला.
या पहाणी दौऱ्यात कोकरे यांना सामाजिक कार्यकर्ते नितीन विश्वनाथ सावंत यांनी सुयोग्य माहिती देऊन पर्यटकांना ,नागरिकांना सातत्याने भेडसावत असणाऱ्या समस्या निदर्शनास आणून दिल्या.तसेच कोकरे यांना या सर्व पेमास्टर उद्यानातील वास्तू संदर्भात ऐतिहासिक महत्व आणि माहिती नितीन सावंत यांनी दिली. माथेरानच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आपली भरीव मदत तमाम माथेरानकरांना अपेक्षित आहे, असेही विनंती पुर्वक सांगितले.
त्याप्रमाणे या गावाला कशाप्रकारे विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. केवळ पर्यटन शेतीवर अवलंबून असलेल्या सर्वांच्या व्यवसायात अधिकाधिक भर पडेल याकरिता ते प्रयत्नशील दिसत आहेत. त्यामुळे त्यांनीच आपल्या कार्यकाळात या स्थळाचा सर्वांगीण विकास करावा अशी मागणी सध्यातरी जोर धरू लागली आहे.
कचऱ्या पासून नगर परिषद साठी आर्थिक उत्पन्न प्राप्त झाले पाहिजे त्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहेच. शिवाय डंपिंग ग्राउंड हे नऊ ऑगस्ट पर्यंत पूर्णतः कचरा मुक्त करणार आहोत. मुख्यत्वे पर्यटकांना तसेच नागरिकांना चालण्यासाठी सुसज्ज रस्ते असावेत यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण ही रस्त्याची कामे करणार आहेत. त्यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करून लवकरात लवकर रस्ते बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून पर्यटकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात नगर परिषद प्रशासन तत्पर रहाणार आहे. एकंदरीतच आम्ही आमच्या कालावधीत या गावाला न्याय देण्यासाठी निश्चितच प्रयत्नशील आहोत.
– रामदास कोकरे – प्रभारी मुख्याधिकारी माथेरान नगर परिषद
माथेरानच्या विकासासाठी अनेक नवनवीन कल्पना अधोरेखित असून इथल्या तरुणांना रोजगाराचे साधन मिळवून देण्यासाठी तसेच पर्यटकांची संख्या अधिकाधिक वाढून इकडे पर्यटक आकर्षित होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आम्ही सभागृहातील सर्व सदस्य एकोप्याने कामे पूर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करीत आहोत.
– प्रसाद सावंत – गटनेते माथेरान नगर परिषद
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत