माथेरानमध्ये अतिवृष्टीत घर कोसळले!​

माथेरान : मुकुंद रांजाणे

मागील आठवड्यात पावसाचा सुरू असलेला  जोर अद्याप कायम असून दि.२१ रोजीच्या अतिवृष्टी मध्ये येथील परेश सपकाळ यांचे पत्र्याचे घर यामध्ये सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोसळले. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा काहीशा प्रमाणात नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन परेश सपकाळ यांची विचारपूस केली. यावेळी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या सोबत नगरसेवक शकील पटेल तसेच अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

माथेरानला इको सेन्सेटिव्ह झोन लागू झाल्यापासून कुठल्याही प्रकारच्या बांधकामांना परवानगी नाही. त्यामुळे इथे पिढ्यान पिढ्यापासून वास्तव्यास असलेल्या भूमीपुत्रांना जुन्याच पत्र्याच्या घरात दिवस मार्गक्रमण करावे लागत आहेत. तर एकीकडे सनियंत्रण समितीची परवानगी नाही त्यामुळे काहीही बांधकामे करता येणार नाहीत असे नेहमीच नगर परिषद प्रशासन उत्तरे देत आहेत. परंतु सनियंत्रण समितीने घराच्या किरकोळ दुरूस्ती करिता परवानगी देऊन सुद्धा नगरपरिषदेच्या आडमुठ्या धोरणांमुळे मागील काळात अनेक गरजवंत नागरिकांना जुनीच घरे बांधता आली नाहीत.
निदान यापुढे तरी किरकोळ घरांच्या दुरुस्ती करिता परवानगी देण्यात यावी जेणेकरून अतिवृष्टी मध्ये एखादया गरीब स्थानिक भूमीपुत्राला निवाऱ्याची सोय उपलब्ध करता येईल. अतिवृष्टीमुळे होणाऱ्या अपघातात कुठेही जीवितहानी होणार नाही याची दक्षता नगर परिषद प्रशासनाने घेणे अनिवार्य आहे असे नागरिकांमधून बोलले जात आहे. सध्या परेश सपकाळ यांच्या घराचे नुकसान झाले आहे त्यासाठी शासनाने मदतीचा हातभार लावावा जेणेकरून कुणाचाही संसार उघड्यावर पडणार नाही.असेही बोलले जात आहे.
मी अनेक वर्षांपासून पत्र्याच्या घरात माझ्या कुटुंबासहित जीव मुठीत धरून रहात आहे.शासनाने हागणदारी मुक्त शहरे,गावे करण्याचे धोरण निश्चित केले आहे. परंतु मला अद्याप साधे घराचे नूतनीकरण तसेच शौचालय बांधण्यासाठी परवानगी दिली जात नाही. मोठया प्रमाणात होत असलेल्या पावसाने माझ्या साध्या पत्र्याच्या घराचे सुध्दा केव्हाही नुकसान होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर भविष्यात अशाचप्रकारे माझे घर कोसळून जीवितहानी झाल्यास याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल.यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी माझ्या घराची पाहणी करावी. 
पदमा कुमार सपकाळ – गृहिणी माथेरान
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत