माथेरानमध्ये भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन !

माथेरान : मुकुंद रांजाणे 

माथेरानचे नैसर्गिक सौंदर्य कायमस्वरूपी अबाधित राहण्यासाठी इथले मुख्य आकर्षण म्हणजे हिरवीगार वनराई आहे. ही वनराई दिवसेंदिवस लोप पावत आहे. याकामी वनविभाग आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांच्या प्रमुख सहकार्याने इथला मुख्य पॉईंट असलेला लुईझा पॉईंटच्या एक हेक्टर क्षेत्रात एकूण सातशे विविध फळा फुलांची रोपे लावण्यात आली.
या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे उदघाटन विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या नेतृत्वाखाली, नव्याने नगरपालिका पदभार स्वीकारलेले प्रभारी मुख्याधिकारी रामदास कोकरे, गटनेते प्रसाद सावंत,वनसमिती अध्यक्ष योगेश जाधव, विरोधीपक्ष नेते शिवाजी शिंदे,माजी बांधकाम सभापती शकील पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उप नगराध्यक्ष आकाश चौधरी,माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष शफीक शेख, आर.पी.आई.अध्यक्ष अनिल गायकवाड, माजी नगरसेवक कुलदीप जाधव,भाजपचे अध्यक्ष विलास पाटील, माथेरान पतसंस्था सभापती हेमंत बिरामणे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रशाम दिवाडकर, वन क्षेत्रपाल नारायण राठोड, वन अधिकारी दत्तात्रय निरगुडा आदी मान्यवर उपस्थित होते.
झाडे लावा झाडे वाचवा हे शासनाचे घोषवाक्य असून नुकताच सन २०१७ ते २०१९ जून आणि जुलै महिन्यात या एकंदरीत तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात एकूण ५० कोटी वृक्ष लागवड करण्याबाबत शासनाकडून निर्देशीत करण्यात आले आहे.त्यानुसार दि.२३ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता श्री सदस्यांच्या सहकार्याने येथील लुईझा पॉईंट येथे सातशे रोपे लावण्यात आली.त्यानंतर अकरा वाजता शास्त्री हॉल येथे गावातील नागरिकांना नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले.वृक्षारोपण ही सध्याच्या काळात अत्यंत महत्वाची बाब असून यासाठी जनजागृती करण्यासाठी नगरपालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडीचे आयोजन केले होते.
 तसेच अंगणवाडी मधील छोटयांनी सुद्धा यामध्ये आपला सहभाग नोंदवला. त्यावेळी शिक्षक वृंद तसेच स्थानिक नागरिकांनी या दिंडीत भंजन कीर्तनाच्या माध्यमातुन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.ही दिंडी पंचवटी नगर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात नेऊन तेथेही वृक्षारोपण करण्यात आले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत