माथेरान नगर परिषदेच्या आर्थिक उत्पन्नात पडणार भर! 

मुकुंद रांजाणे : माथेरान

माथेरान नगर परिषदेला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारी दुभती गाय म्हणजे प्रवासी कर आणि वाहन कर ठेका. याच मुख्य स्रोतांवर माथेरान नगर परिषद आपली अनेक वार्षिक  गणिते सोडवून विकासाकडे वाटचाल करीत असते. त्रैवार्षिक ठेके मागील काळापासून दिले जात होते. या त्रैवार्षिक ठेक्यात जवळपास अकरा कोटी रुपयांच्या आसपास ठेका संबंधित ठेकेदार घेत होते.परंतु या ठेक्याच्या माध्यमातून खूपच उलाढाल होत असल्याने यावेळेस कार्यकुशल प्रभारी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी प्रवासी कर आणि वाहन कर ठेका हा त्रैवार्षिक देण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेच्या माध्यमातून देण्यात यावेत जेणेकरून नगर परिषदेचा आर्थिक स्तर उंचावेल अशा स्वरूपाची सकारात्मक भूमिका घेतल्यावर त्यास विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी दुजोरा देऊन या महत्वाकांक्षी निर्णयाचे स्वागत केले आहे.
त्यानुसार राज्यातील ह्या पहिल्याच क वर्ग नगर परिषद मध्ये ऑनलाइन लिलाव पध्दतीने ठेका देण्यासाठी नगर परिषद यंत्रणा सज्ज झाली असून त्याबाबत दि.१४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रवासी कर ठेका भरण्यासाठीएकूण सात निविदा धारकांचे फॉर्म आले होते तर वाहन करासाठी एकूण दहा निविदा धारकांनी फॉर्म भरलेले आहेत.
प्रवासी करासाठी मुंबई, पुणे, कर्जत, खारघर, पनवेल येथील निविदा धारक आहेत तर वाहन करासाठी अहमदनगर, पुणे, वाशी, मुंबई, कर्जत, पनवेल, खारघर, कळंबोली येथील निविदा धारकांनी फॉर्म भरलेले आहेत.
या सर्वच आलेल्या निविदा फॉर्मची तपासणी छाननी दि. १८ ते २१ सप्टेंबर पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत नगर परिषद कार्यालयात ऑनलाइन होणार आहे.तर दि.२२ पासून सकाळी दहा वाजल्यापासून दोन्हीही कामांची लिलाव पद्धत बोली सुरू होणार आहे. ही बोली ऑनलाइन दि.२४ तारखेपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे मात्र ऑनलाइन बोली करताना पन्नास हजार रुपये अथवा एक लाख रुपयांनी वाढुनच निविदा धारकांना बोली करावी लागणार आहे.यामध्ये दर पंधरा मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे. त्यामुळे ह्या महत्वपूर्ण ठेक्याची खरी रंगत दि.२४ तारखेला सर्वांना अनुभवायला मिळणार आहे. जेवढी अधिकाधिक बोली ज्या निविदा धारकांची असेल त्यांना ही कामे दिली जातील. याच मुख्य निविदा स्रोतांवर नगर परिषदेची खरी मदार अवलंबित आहे. यामुळे नगर परिषदेला यावेळेपासूनच आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
मागील निवडणूक काळात सध्याच्या सत्ताधारी गटाने आम्हीं निवडून आल्यावर पारदर्शक कारभार करून या गावाला विकासाचे पंख लावून एक वेगळीच क्रांती घडवून आणू ,टेंडर मध्ये आम्ही समाविष्ट राहणार नाहीत. मागील सत्ताधारी मंडळी टेंडर माफिया होती. त्यामध्ये आम्हीच बदल घडवून आणू.असे सूतोवाच केले होते. गावात काहीतरी बदल घडवून आणू अशा फुशारक्या मारल्या होत्या परंतु सध्याचे वातावरण पाहिल्यास याच सत्तेतील काही जबाबदार व्यक्तीची ही कामे घेण्यासाठी धडपड सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.त्यामुळे निवडणूक काळात दिलेल्या अनेक पोकळ आश्वासनांना मूठमाती देऊन केवळ स्वतःच्या पोटाची सोय करण्यात सत्ताधारी गटातील काही मंडळी अग्रेसिव्ह दिसत आहेत.तर काही माजी लोकप्रतिनिधी सुध्दा हे मोठया रक्कमेचे ठेके घेण्यासाठी रथी महारथी उत्सुक अन इच्छुक आहेत. त्यामुळे सत्ताधारी गटाने निदान टेंडर बाबतीत आम्हाला काहीएक स्वारस्य नाही अशाच दिलेल्या शब्दाला जागले पाहिजे. असेही स्थानिक पातळीवर बोलले जात आहे.

नगर परिषदेच्या दृष्टीने ऑनलाइन लिलाव पद्धत हे हितावह ठरणार असून यामध्ये पारदर्शकता असेल.योग्य स्पर्धा होईल आणि महत्वाचे म्हणजे नक्कीच आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी मदत होईल. रामदास कोकरे — मुख्यधिकारी माथेरान नगर परिषद

माथेरान मध्ये दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे.प्रवासी आणि वाहन कराचा ठेका दरवेळेस त्रैवार्षिक पद्धतीने दिला जात होता परंतु नेहमी पेक्षाही अधिक नगर परिषद तिजोरीत जमा व्हावे जेणेकरून विकासकामांना हातभार लागेल. यासाठी ऑनलाइन लिलाव पध्द्तीने नगर परिषद साठी संबंधित निविदा धारक हे वाढीव बोली लावणार आहेत. त्यामुळेच निश्चितच अधिक रक्कम प्रवासी कर आणि वाहतूक करांच्या माध्यमातून मिळेल.राज्यातील”क” वर्ग नगरपरिषद करिता पहिल्यांदाच मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी ही संकल्पना मांडली त्यासाठी आम्ही दुजोरा दिला आहे. प्रेरणा प्रसाद सावंत — नगराध्यक्षा माथेरान नगर परिषद

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत