माथेरान मधील घरे अधिकृत होण्यासाठी राज्यमंत्र्यांना नगराध्यक्षांचे साकडे !

माथेरान : मुकुंद रांजाणे

पिढ्यानपिढ्या वास्तव्यास राहून सुद्धा येथील स्थानिकांची घरे आजतागायत अधिकृत केलेली नसून त्यावर नगरपालिकेने अनधिकृत शिक्कामोर्तब केल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याकामी ही पिढ्यानपिढ्या असलेली घरे अधिकृत व्हावीत यासाठी नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी नुकताच राज्यमंत्री रणजीत पाटील यांची भेट घेतली आणि त्यांना माथेरान मधील घरे अधिकृत व्हावीत या आशयाचे लेखी निवेदन सादर केले.
जगप्रसिद्ध असलेले माथेरान हे पर्यटनस्थळ सह्याद्रीच्या पर्वतरांगेत सन  १८५० मध्ये तत्कालीन ठाण्याचे ब्रिटिश कलेक्टर सर ह्युज मॅलेट यांनी स्थापिलेले आहे.हे पर्यटकांचे अत्यंत आवडते असे अभूतपूर्व थंड हवेचे ठिकाण आहे त्यामुळे इथे बाराही महिने पर्यटकांची रेलचेल पाहावयास मिळते. बिनशेतीचा संपूर्ण भाग असल्याने सर्वांचे जीवनमान हे केवळ पर्यटन शेतीवर अवलंबून आहे. येथील सर्व जमीन ही शासकीय आहे.ती नागरिकांना भाडेपट्ट्याने दिलेली आहेत. यापैकी माथेरान भूखंडावर हॉटेल्स उभारलेले आहेत तर बाजार भूखंडावर नागरिकांची घरे आहेत.वाढती लोकसंख्या आणि पर्यटन व्यवसायाची गरज लक्षात घेता स्थानिकांनी शासनाकडे रहाण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी मागणी केली होती.परंतु जागा न मिळाल्याने बाजार भूखंडातील मोकळ्या जागेवर नागरिकांनी नैसर्गिक गरजेपोटी आपली घरे बांधली असून ते पिढ्यानपिढ्या रहात आहेत.स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नगरपरिषद घरांची कर आकारणी करीत आहे. तसेच त्यांना नगरपरिषदेने वीज व पाणी कनेक्शन अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.परंतु या सर्व घरांवर आजतागायत अनधिकृत शिक्कामोर्तब केल्यामुळे ती अधिकृत झालेली नाही.यासाठी नगरपरिषदेने ही घरे ,अतिरिक्त बांधकामे नियमित व्हावीत त्याबद्दल सुधारित विकास आराखड्यात तसे प्रस्ताव केलेले आहेत.गेली अनेक वर्षे सुधारित विकास आराखडा अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.बॉम्बे एनव्हायरमेन्ट गृप या पर्यावरण वादी संस्थेने राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केलेल्या माथेरान संदर्भातील एका याचिकेवर मा. हरित लवादाने एक अंतरिम आदेश दिला आहे.या आदेशाचा चुकीचा अर्थ लावत प्रशासनाने माथेरान मधील अनधिकृत बांधकामावर कारवाईचे आदेश दिले आहेत.
आणि भविष्यात जर अशाप्रकारे स्थानिकांच्या घरांवर बुलडोझर फिरवला गेला तर इथला पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेला भूमिपुत्र उध्वस्त होऊन देशोधडीला लागेल यासाठी राज्यमंत्र्यानी याबाबत साधकबाधक विचार करून स्थानिकांना न्याय मिळवून द्यावा या आशयाचे निवेदन विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी राज्यमंत्री रणजित पाटील यांना दिले आहे.त्यामुळे आगामी काळात स्थानिकांना काय  न्याय मिळणार आहे याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत