माथेरामध्ये चिखलाच्या रस्त्यांमुळे चालणे अवघड!

माथेरान : मुकुंद रांजाणे 

पावसाळी पर्यटनास आलेल्या पर्यटकांना माथेरामध्ये चिखलाच्या रस्त्यातून चालणे अत्यंत जिकीरीचे बनलेले असून पाय घसरून पडण्याची संख्या वाढते आहे.त्यामुळे नगरपालिकेच्या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पाण्याचे पाईप टाकण्याची कामे मागील दोन वर्षांपासून सुरू आहेत.त्यांनी पाईप टाकताना रस्ते मोठया प्रमाणात खोदले आहेत. तेसुद्धा त्याचवेळी पूर्ववत करणे आवश्यक असतांना तसेच सोडलेले होते. त्यामुळे सर्व माती वर आल्याने पावसाला सुरुवात झाली असतांना मुख्य रस्त्यावर पर्यटकांना तसेच नागरिकांना जेष्ठ वयोवृद्ध मंडळी आणि शालेय विद्यार्थ्यांना चिखलाच्या रस्त्यातूनच मार्गक्रमणकरावे लागते आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेव्हर ब्लॉकचे रस्ते केवळ पादचाऱ्यांना चालण्यासाठी असतांना त्यावरून घोडे चालतात आणि मुख्य बाजारपेठेच्या भागात पेव्हरब्लॉकच्या रस्त्यावर घोडे उभे केले जात असल्यामुळे सर्वांनाच नाईलाजास्तव मधल्या मातीच्या रस्त्यातून पावसाळ्यात चिखलातून पायपीट करावी लागत आहे.त्यामुळे या चिखलाच्या रस्त्यावर पाय घसरून पडणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे यामुळे किरकोळ अपघात होऊन पर्यटक जखमी देखील होत आहेत. सध्या जरी बाजारपेठ भागात रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेतली असली तरीसुद्धा या कामाला गती नसल्यामुळे जून महिना केवळ मुख्य रस्त्याच्या डागडुजी साठी जाणार आहे त्यामुळे शनिवार आणि रविवार या सुट्टयांच्या हंगामात पर्यटकांना तसेच व्यापारी वर्गाला खूपच त्रासदायक होणार आहे.
तर काही महत्वाच्या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी पाण्याच्या मोऱ्या जवळ मोठे खड्डे पडलेले आहेत यामध्ये एखाद्या घोड्याचा पाय अडकून जीवितहानी होण्याची दाट शक्यता अश्वपालकां कडून वर्तवली जात आहे.याबाबत सातत्याने सोशल मीडियावर वार्तांकन होत असतांना देखील नगरपालिका बघ्याची भूमिका घेत आहेत. संभाव्य अपघात टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने वेळीच ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे जागरूक नागरिक बोलत आहेत.
मुख्य रस्त्यावर काही ठिकाणी पावसाळ्यात अक्षरशः तळे साचलेले असते अशावेळी या चिखलातून चालणे ही सर्वासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.नगरपालिका प्रशासन गावाचा विकास करण्याऐवजी नको त्या ठिकाणी आपला अमूल्य वेळ खर्ची करून गावाच्या विकासा पेक्षा अधोगतीकडे नेत आहेत.त्यामुळे याचा नाहक त्रास नियमितपणे येणाऱ्या पर्यटकांना सोसावा लागत आहे. प्रकाश सुतार — माजी नगरसेवक माथेरान
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत