माथेरामध्ये विजेचा शॉक लागुन घोड्याचा मृत्यू

माथेरान :मुकुंद रांजाणे 

माथेरामध्ये पॉईंटची सैर करण्यासाठी जाताना एको पॉईंट येथील उघड्यावर असलेल्या विद्युत वाहिनीच्या तारांचा शॉक लागल्याने एका घोड्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत.सुदैवाने घोड्यावर बसलेल्या पर्यटकांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने थोडक्यात त्यांचा जीव बचावला आहे.या दुर्दैवी घटनेमुळे नगरपालिका आणि महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारा बाबतीत स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दि.५ रोजी दोन घोड्यावरून पर्यटक एको पॉईंट येथे फिरवण्यासाठी गेले असता तेथे असलेल्या भूमीगत विद्युत वाहिन्या ह्या जमिनीवर आलेल्या होत्या.त्यावर घोड्याचा पाय पडल्याने घोड्याच्या पायाला लोखंडी नाल असल्यामुळे दोन्ही घोड्यांना शॉक लागला यामध्ये एका घोड्याने कशीबशी आपली सुटका केली तर दुसरा घोडा यामध्ये गुरफटला गेला त्याला विद्युत वाहिनीचा जबरी शॉक लागला त्यावेळेस लगेचच घोड्यावर स्वार असलेल्या पर्यटकांनी प्रसंगावधान राखून उड्या मारल्या अन्यथा त्यांचाही जीव यामध्ये गमवावा लागला असता.दरवर्षी अशा घटना घडत आहेत तरीसुद्धा याकडे नगरपालिका आणि महाराष्ट्र वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करीत आहेत.जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये किंमतीचा घोडा या दुर्घटनेत दगावला असल्याने घोडेवाल्याचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.सध्या हा पंधरा दिवसांचा व्यासायिक शेवटचा हंगाम सुरू असून अशाप्रकारे घोड्याचा अपघाती मृत्यू झाल्याने घोडे मालकावर आर्थिक दृष्ट्या संकट ओढवले आहे.या सर्वसामान्य घोडेवाल्याचे नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम मिळावी अशी मागणी समस्त घोडेवाल्यांकडून होताना दिसत आहे.निदान यापुढे तरी संबंधीत खात्याने कामचुकारपणा न करता असे अपघात होऊ नयेत यासाठी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे असे सर्वच स्तरांतून बोलले जात आहे.
महाराष्ट्र वीज वितरण कंपनी आणि नगरपालिका प्रशासन यांच्या अनागोंदी कारभारामुळे वीजेच्या भूमिगत केबल टाकताना झालेली घाईगडबडीतील कामे ही अत्यंत निकृष्ठ दर्जाची आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी विजेच्या पोलावरील डी.पी.तील वायर सुद्धा उघड्या आहेत आज घोड्याचा मृत्यू झाला आहे पुढे एखाद्या मनुष्याला देखील आपले प्राण गमवावे लागतील त्यावेळेस जबाबदार कोण ?
आशाताई कदम — अध्यक्षा अश्वपाल संघटना माथेरान
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत