मारेगाव पोलिसांवर आरोपीचा हल्ला

यवतमाळ : रायगड माझा वृत्त 

मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे रात्री उशिरा आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले असता, आरोपीने अचानक पोलिसांवर हल्ला चढवला. यात एक पोलीस ठार तर दोन जण जखमी झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली.

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पोलीस ठाण्यापासून १० कि. मी. अंतरावर असलेल्या हिवरी येथे घडलेली ही घटना अंगाचा थरकाप उडवणारी आहे. मारेगावचे पोलीस निरीक्षक वडगावकर यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार मधुकर निळकंठ मुके (वय ५२), हवालदार राजेंद्र बाजीराव कुळमेथे (वय ४८), पोलीस शिपाई प्रमोद फुफरे (वय ३१), पो.चालक राहुल बोन्डे (वय ३२), पोलीस नाईक निलेश वाढई (वय ३५) हे सर्व पोलीस अजामीनपात्र वॉरंट घेऊन आरोपी अनिल लेतू मेश्राम (वय ३५) याला ताब्यात घेण्याकरीता त्याच्या घरी गेले. आपल्याला पकडायला पोलीस आल्याचे समजताच आरोपी आणि त्याची आई इंदिरा मेश्राम यांनी लाकडी दांडक्याने पोलिसांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याने पोलीस गोंधळले. यात जमादार राजेंद्र कुळमेथे यांना गंभीर दुखापत झाल्याने ते जखमी झाले. पोलिसांनी हल्ला रोखण्याचे प्रयत्न केले. परंतु आरोपीच्या आक्रमकतेपुढे पोलीस हतबल झाले.

यावेळी पोलीस हवालदार मधुकर मुके, पोलीस शिपाई प्रमोद फुफरे या हल्यात गंभीर जखमी झाले. दरम्यान, आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरारी झाला. यावेळी गावातील गुणवंत देरकर आणि सहकारी मदतीला धावून आले. गंभीर जखमी राजेंद्र कुळमेथे यांना घेऊन पोलीस माघारी मारेगावला आले.

राजेंद्र कुळमेथेसह सर्व जखमींना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी कुळमेथे यांना मृत घोषित केले. तर मधुकर मुके, प्रमोद फुफरे यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची फिर्याद हवालदार मधुकर मुके यांनी मारेगाव पोलिसात दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत