मालवण : कोळंब पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद

मालवण : रायगड माझा वृत्त

धोकादायक कोळंब पूल गेली दोन वर्षे अवजड व बस वाहतुकीस बंद आहे. तर वर्षभर पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. पुलावरून कार, रिक्षा व दुचाकी वाहतूक सुरू होती. मात्र प्रांताधिकारी यांच्या आदेशाने धोकादायक पुल अंतिम दुरुस्ती कामासाठी मंगळवार पासून पूर्णपणे वाहतुकीस बंद करण्यात आला.

मंगळवार सकाळ पासूनच पूल वाहतुकीस बंद झाल्याने मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी, रिक्षा व कारचालक यांना कोळंब, निव्हे, आडारी या अत्यंत अरुंद, खड्डेमय व धोकादायक मार्गावरून जणू तारेवरची कसरत करत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दोन दुचाकी चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटून दोन अपघातही सकाळी घडले. त्यानंतर पुलावरून दुचाकी वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र पूल दुरुस्तीसाठी मोठी मशनरी येत्या एक दोन दिवसात दाखल झाल्यानंतर पुलावरून दुचाकी वाहतूकही बंद करण्यात येणार आहे. असे ठेकेदार एजन्सीने स्पष्ट केले आहे.

ग्रामस्थांकडून बांधकाम अधिकारी धारेवर
पर्यायी रस्ता सुस्थितीत नसताना पूल वाहतुकीस पूर्णपणे बंद केल्याने ग्रामस्थ, वाहनचालक संतप्त बनले. ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता प्रकाश चव्हाण, अभियंता प्रदीप पाटील यांना कोळंब पूल पर्यायी रस्त्यांबाबत जाब विचारला. यावेळी कोळंब पूल संघर्ष समिती अध्यक्ष विजय नेमळेकर, कोळंब उपसरपंच समीरा बांदेकर, अनिल निव्हेकर, संदीप भोजने, प्रियाल लोके व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

अपघात घडल्यास जबाबदारी कोण घेणार ?
निव्हे, आडारी मार्ग धोकादायक आहे. तर ओझर कातवड मार्गही खड्डेमय आहे. मात्र पूल बंद करण्यापूर्वी या रस्त्यांची दुरुस्ती का करण्यात आली नाही ? या धोकादायक मार्गावरून प्रवास करताना अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार ? असे संतप्त सवाल वाहन चालक व सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केले जात आहेत. तर पर्यायी रस्ता काम लवकर सुरू न झाल्यास पूल पुन्हा वाहतुकीस खुला करू असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत