मालेगाव बॉम्बस्फोट: स्वामी पांडेविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

मुंबई: रायगड माझा वृत्त 

मालेगावमधील २००८च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी स्वामी दयानंद पांडे याच्याविरुद्ध एनआयए विशेष न्यायालयाने बुधवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले. त्याचवेळी या प्रकरणातील सर्व आरोपींविरुद्ध ५ सप्टेंबरला आरोपनिश्चिती करण्यात येईल, असे संकेत देत न्या. विनोद पडाळकर यांनी सर्वांना त्यादिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही दिले.

आरोपी पांडे याने जामिनावर बाहेर गेल्यानंतर अनेकदा न्यायालयातील सुनावणीला हजर राहण्याचे टाळले आहे, असे निदर्शनास आणत त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याची विनंती अॅड. अविनाश रसाळ यांनी एनआयएतर्फे अर्जाद्वारे केली होती. त्यावरील सुनावणीच्या वेळी पांडेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, पांडे सध्या जम्मूमध्ये आहे. सध्या चातुर्मास सुरू असल्याने पांडेला काही पुजाविधी करायच्या असल्याने सप्टेंबरअखेर न्यायालयात हजर राहण्याची मुभा द्यावी, अशी विनंतीही वकिलांनी केली. मात्र, ही खटला लांबवण्याची शक्कल आहे, असा दावा करत अॅड. रसाळ यांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला. अखेर पांडेची विनंती फेटाळून लावल न्यायाधीशांनी त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत