माळशेज घाटातील कोसळलेली दरड हटविली; वाहतूक हळूहळू सुरू

ठाणे : रायगड माझा वृत्त

पावसामुळे २० तारखेला पहाटे माळशेज घाटात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळून रस्ता बंद झाला होता. मात्र राष्ट्रीय महामार्ग, महसूल विभाग , पोलीस यांनी भर पावसात आणि दाट धुके असूनही दरड, माती दूर करण्यात यश मिळविले असून चार दिवसानंतर वाहतूक सुरू केली आहे

.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी यासंदर्भात सांगितले की, राष्ट्रीय महामार्गच्या मुरबाड उप विभागीय कार्यालयाने कठीण परिस्थितीत काम करून, जेसीबी, ट्रक्स लावून हा रस्ता पूर्ववत केला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन स्वतः या सगळ्या कामावर लक्ष्य ठेवून होते, याशिवाय प्रांत अधिकारी प्रसाद उकर्डे, मुरबाड तहसीलदार सचिन चौधर आणि त्यांचे कर्मचारी, टोकावडे पोलीस हे लवकरात लवकर या भागातून वाहतूक सुरळीत कधी होईल हे पहात होते.

पावसाचा जोर असल्याने २१ आणि २२ रोजी थांबून थांबून काम करावे लागत होते, शिवाय दरड दूर केलेली असली तरी डोंगर माथ्यावरून सतत पाण्याचे प्रवाह, छोटे छोटे दगड रस्त्यावर येतच होते. त्यामुळे कामाचा वेग मंदावला होता. नंतरचे दोन दिवस पाऊस बऱ्यापैकी कमी झाल्याने कामही झपाट्याने पूर्ण करता आले. काल उशिराने वाहतूक हळूहळू सुरू करण्यात आली.

वाहतूकीस परवानगी दिलेली असली तरी या भागातून सावधगिरी बाळगूनच वाहने नेण्यात येत असून पोलीस आणि महामार्ग कर्मचारी तैनात आहेत.

पर्यटकांना प्रतिबंधात्मक आदेश
दरड कोसळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या निर्देशाप्रमाणे माळशेज घाटातील सर्व धबधब्यांच्या ठिकाणी १ किमी परिसरात पर्यटकांसाठी प्रतिबंधात्मक आदेश तहसीलदार सचिन चौधर यांनी जारी केले आहेत. ते ३१ ऑगस्ट पर्यंत अंमलात राहतील.

सुट्ट्यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करतात, कुठलीही दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ नये म्हणून हे आदेश काढण्यात आले आहेत.

खोल पाण्यात उतरणे, धबधब्याच्या ठिकाणी जाणे, धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहने वेगाने चालविणे, या परिसरात मद्यपान करून प्रवेश करणे, मोठमोठ्याने संगीत लावणे, महिलांची छेडछाड असे प्रकार झाल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत