मावळमध्ये बारणेंपुढे गड राखण्याचे आव्हान

Maval-Constituency

रायगड माझा वृत्त

शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे मावळमधून पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप सध्या भाजपचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष आणि आमदार आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीतर्फे पार्थ पवार मावळमधून लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच पार्थ रिंगणात उतरणार नसल्याचे स्पष्ट केलंय. त्यामुळे, राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचा उमेदवारीसाठी विचार होऊ शकतो.

दशकापूर्वी मावळ मतदारसंघ झाल्यानंतर पहिल्यांदा शिवसेनेचे गजानन बाबर, नंतर बारणे निवडून आले. बारणे आणि जगताप दोघेही कट्टर प्रतिस्पर्धी. जगताप मूळचे राष्ट्रवादीचे. गेल्या निवडणुकीत ते शेकापकडून लढले. मात्र, विधानसभा निवडणुकीत ते भाजपचे आमदार म्हणून चिंचवड मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर अजित पवार यांचा बालेकिल्ला मानलेली पिंपरी-चिंचवड महापालिका जगताप यांनी आमदार महेश लांडगेंच्या मदतीने भाजपकडे खेचून घेतली. बारणे खासदार असले, तरी शिवसेनेचे अत्यल्प नगरसेवक आहेत. शहराच्या राजकारणात जगताप यांचाच दबदबा आहे.

युती झाल्यास, बारणेंचे काम करणार नसल्याचे भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. भाजपचे अनेक नगरसेवक पूर्वीश्रमीचे राष्ट्रवादीचे असल्यामुळे, त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला होण्याची शक्‍यता आहे. हे लक्षात घेऊन शिवसेनेला व्यूहरचना करावी लागेल.

मतदारसंघातले प्रश्‍न 
शास्तीकर रद्द व अनधिकृत बांधकाम नियमित करणे
पवना जलवाहिनीचा रखडलेला प्रकल्प
शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्‍न

२०१४ मधील मतविभाजन
श्रीरंग बारणे (शिवसेना) ५,१२,२२६ (विजयी)
लक्ष्मण जगताप (शेकाप) ३,५४,८२९
ॲड. राहुल नार्वेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) १,८२,२९२

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत