मिरजेत प्रेयसीच्या मुलाचा फासावर लटकावून खून

मिरज :रायगड माझा

बिडी आणण्यास नकार दिल्याने प्रेयसीच्या मुलाचा फासावर लटकावून खून करण्यात आला. मिरजेतील ख्वाजा वसाहत येथे रविवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. गणेश यल्लाप्पा वाल्मिकी (वय ९) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश हणमंताप्पा तळबार (वय ३५) या संशयितास शहर पोलिसांनी अटक केली आहे.

ख्वाजा वसाहतीतील शामराव कांबळे यांच्याकडे भाड्याने खोली घेऊन गणेशची आई ज्योती यल्लाप्पा वाल्मिकी (वय ३०) तीन मुलांसोबत राहत होती. तिचे गणेश तळबार याच्याशी अनैतिक संबंध होते. तो गवंडी काम करीत होता. ज्योतीला गणेशसह लक्ष्मी (५ वर्षे) व हणमंत (वय ४, वर्षे) ही मुले आहेत. कौटुंबिक वादातून ज्योतीला पाच वर्षांपूर्वी पतीने सोडून दिले आहे. मुलांसोबत भीक मागून उदरनिर्वाह करीत होती. गणेश तळबार हा ज्योतीच्या घरातच राहत होता. रविवारी सकाळी ज्योती ही सुवर्णा, मंजुळा, शब्बो या महिलांसोबत जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील आठवडा बाजारात भीक मागण्यासाठी गेली होती. गणेश, लक्ष्मी व हणमंत ही मुले घरीच होती.
संशयित तळबार याने मोठा मुलगा गणेश यास दुकानातून बिडी आणण्यास सांगितले. गणेश याने बिडी आणण्यास नकार दिल्यामुळे तळबारने लक्ष्मीला बिडी आणण्यास पाठविले. त्यानंतर तळबारने गणेशला ‘बिडी आणण्यास का गेला नाहीस’असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर त्याने सुती दोरी घेऊन गणेश यास घराच्या तुळईस फासावर लटकवले. गळ्याला फास लागल्याने गणेशचा तडफडून मृत्यू झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी याबाबत पोलिसांनी माहिती दिल्यानंतर गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रवीण कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संशयित तळबार हा घराबाहेर बसला होता. गणेशचा मृतदेह गळफासाने लटकत होता. हा प्रकार पाहून पोलिसांनाही धक्का बसला. त्याने तळबारला ताब्यात घेऊन पंचनामा केला.
घटनेनंतरही संशयित बिडी ओढत बसला…
गणेशला फासावर लटकावून निर्विकार अवस्थेत तळबार हा घराबाहेर बिडी ओढत बसला होता. मुलगी दुकानातून बिडी घेऊन घरी आल्यानंतर भावाचा मृतदेह पाहून तिला हुंदका दाटून आला. ती पळत शेजाऱ्यांकडे गेली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेबाबत माहिती मिळताच मृत गणेशची आई ज्योती ही जयसिंगपूरहून घरी आली. गणेशच्या मृत्यूमुळे ख्वाजा वसाहत परिसरात हळहळ व्यक्त होत होती. मुलाच्या खूनप्रकरणी ज्योती वाल्मिकी हिने गणेश तळबार याच्याविरूध्द फिर्याद दिली असून पोलिसांनी गणेश तळबार याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत