मिरारोड: विनयभंगप्रकरणी BJP नगरसेवक अटकेत

 

भार्इंदर : रायगड माझा वृत्त 

मिरारोड येथील मिरा-भार्इंदर पालिकेतील दौलत गजरे या भाजपच्या नगरसेवकाला सोमवारी विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. नगरसेवकासह त्याची पत्नी व मुलीलाही अटक करण्यात आली. मात्र सायंकाळी या तिघांची जामिनावर सुटका करण्यात आली.

मीरारोडच्या सिल्वर पार्क, सुंदर सरोवर कॉम्प्लेक्स भागात राहणाऱ्या सायली घाग (१९) या तरुणीने तक्रार केली आहे. ही तरुणी आई-वडील व भावासह येथे राहते. १८ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही तरुणी राहते त्या कॉम्पलेक्समध्ये देवी मूर्तीच्या विसर्जन कार्यक्रमासाठी सर्व रहिवासी जमले होते. यावेळी किरकोळ कारणावरून कमल दौलत गजरे, आकांक्षा गजरे यांनी मारहाण-शिवीगाळ केली तसेच दौलत गजरे यांनीही दादागिरी करून धमकावल्याची तक्रार या तक्रारदार तरुणीने केली. सोसायटीच्या आवारात हे भांडण झाले.

या प्रकरणी या तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर काशिमीरा पोलिसात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा रविवारी रात्री नोंद करण्यात आला. कमल दौलत गजरे, आकांक्षा दौलत गजरे, दौलत गजरे या तिघांना सोमवारी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. दौलत हे मिरा-भाईंदर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ अ चे भाजपचे नगरसेवक आहेत.

या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल होत नसल्याने रविवारी रात्री शिवसेनेचे खासदार राजन विचारे व आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह काशिमिरा पोलिस ठाणे गाठले. तसेच इतर पक्षाच्या पधाधिकाऱ्यांनीही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पोलिसांना जाब विचारल्यानंतर याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत