मी सर्वसामान्य कार्यकर्ता; मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत नाही – गिरीश महाजन

काळखेडे (ता. जामनेर) - सत्कार सोहळ्यात बोलताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन. व्यासपीठावर विविध मान्यवर.

जामनेर : रायगड माझा वृत्त

मी भारतीय जनता पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी माजी खासदार ईश्‍वरलाल जैन यांना वक्तव्याला प्रतिउत्तर दिले.

काळखेडे (ता. जामनेर) येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास उपस्थित माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी अध्यक्षीय भाषणात मंत्री गिरीश महाजन यांनी आता राज्याचे नेतृत्व करावे, मुख्यमंत्री व्हावे, असा मानस व्यक्त केला होता. तोच धागा पकडून मंत्री महाजन म्हणाले मला भरीस पाडू नका, मुख्यमंत्री पदाची लालसा कधीही केली नाही, त्यासाठी उत्सुकही नाही, आहे त्या ठिकाणी राहूनही राज्यातील जनतेची सेवा करता येते असे ठामपणे प्रतिउत्तर दिले.

काळखेडे येथील मूळ रहिवासी हिरालाल सोनवणे यांची जिल्हाधिकारीपदी निवड झाल्याने मंत्री महाजनांच्या हस्ते त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. व्यासपीठावर माजी खासदार ईश्वरलाल जैन, आमदार चंदुलाल पटेल, जगन्नाथ चव्हाण, श्रीकांत खटोड, नवल पाटील, बाबूराव गवळी, ज्ञानेश्वर बोरसे आदी अधिकारी, पदाधिकारी होते.

सत्कारमूर्ती हिरालाल सोनवणेंचेही आपल्या भाषणात कौतुक करून मंत्री महाजन म्हणाले की, कठोर परिश्रम, अभ्यास याला यशस्वी होण्यासाठी पर्याय नाही असे सांगून काळखेडे येथे अद्ययावत ग्रंथालय-वाचनालय बांधून देण्याची घोषणा केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत