मुंडेंच्या मृत्यूवर बोलणाऱ्यांची चौकशी करावी लागेल – पंकजा मुंडे

Pankaja-Munde

बीड : रायगड माझा वृत्त

दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांना काय झाले हे माहीत असेल, तर ज्यांनी केले त्यांचा जीव घ्यायची ताकद माझ्या लोकांमध्ये आहे. मला कुठल्या तपासी यंत्रणेची गरज नाही, असे विधान महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

नांदूरघाट येथे रविवारी उशिरा विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमांच्या निमित्ताने झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस व जयंत पाटील यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली. जयंत पाटलांना हे शोभतं का? चार वर्षांनंतर मुंडे साहेबांच्या मृत्यूमध्ये तुम्हाला राजकारण दिसतय. मुंडे साहेबांची हत्या झाली असेल तर त्याची चौकशीची सुरवात तुमच्यापासून करावी लागणार, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. लबाड लोकांना मुंडे साहेबांचा मृत्यू ही एक मोठी संधी वाटते. अरे, मी मुंडेंची लेक आहे, हत्या झाली की नाही हा विषय तुमचा नाही. जे कुणी याबद्दल बोलतात त्यांच्यापासूनच चौकशीला सुरवात करावी लागेल, असेही त्या म्हणाल्या. माझ्या बापाच्या मृत्यूचे राजकारण करायला विरोधी पक्षातील नेत्यांना लाज वाटली पाहिजे, असेही त्या म्हणल्या.

माझा राजीनामा त्यांना हवाय, तुम्हाला माझी का भीती वाटते, असा सवालही त्यांनी केला. मी एक आवाज दिला तर मुंबई – दिल्लीपर्यंत माझे लोक यायला तयार आहेत; पण माझ्या लोकांनी लाठ्या – काठ्या खाव्यात अशी त्यांची चाल आहे. असल्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. मी सीबीआय अधिकारी नाही किंवा हॅकरही नाही. मी मुंडेंची लेक आहे. खालच्या पातळीवर घाणेरडे राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही झाले नाही, असेही त्या म्हणाल्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत