मुंबईचा पारा घसरला!

मुंबई : रायगड माझा वृत्त

नाताळच्या आगमनानंतर मुंबईकरांना हवामानदिलासा मिळाला आहे. मुंबईचे कमाल तापमान मंगळवारी ३० अंशांखाली उतरले. गेल्या आठवड्यात ३४ अंशांपर्यंत पारा चढल्यानंतर पुन्हा मुंबईत उत्तर आणि वायव्येकडून वारे वाहायला लागल्याने कमाल तापमान खाली उतरले आहे. मौसमात पहिल्यांदाच मुंबईकर हा अनुभव घेत आहेत.  मुंबईत मंगळवारी कुलाबा येथे कमाल तापमान २८.६ तर सांताक्रूझ येथे २९.० अंश सेल्सिअस होते. किमान तापमानाचा पाराही सांताक्रूझ येथे १७.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. कुलाबा येथे किमान तापमान २०.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

सांताक्रूझ येथे मंगळवारी कमाल तापमानाचा पारा सरासरी कमाल तापमानापेक्षा २.८ अंशांनी तर कुलाबा येथे २.७ अंशांनी उतरल्याची नोंद झाली. याशिवाय मुंबईत अनेक ठिकाणी संध्याकाळी नोंदले गेलेले तापमान २५ अंशांच्या आसपास होते. वरळी येथे हे तापमान २५ अंशांखाली होते. पवई, कांदिवली पश्चिम, मालाड पश्चिम, माझगाव येथेही पारा २६ ते २७ अंशांदरम्यान होता. घाटकोपर येथे मंगळवारी सर्वाधिक कमाल तापमान नोंदवण्यात आले. सांताक्रूझ, मुलुंड पश्चिम येथेही इतर उपनगरांच्या तुलनेत तापमान थोडे चढे होते. दिवसा उत्तर आणि वायव्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईच्या कमाल तापमानामध्ये हळूहळू फरक जाणवायला सुरुवात झाली आहे, असे प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. या वाऱ्यांमुळे संध्याकाळसोबतच दुपारच्या वेळीही गार वाऱ्यांचा अनुभव येत आहे.

वायव्य भारत, मध्य भारत येथे हिमालयावरून येणारे वारे सातत्याने येत असल्याने या भागामध्ये येत्या चार ते पाच दिवसांमध्ये किमान तापमान २ ते ४ अंशांनी खाली जाईल, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर २८ ते ३० डिसेंबरदरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ येथे शीतलहरीचा इशाराही देण्यात आला आहे. छत्तीसगड, गुजरात, झारखंड येथेही शीतलहरीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नव्या वर्षाचे स्वागतासाठी पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली येथे धुक्याचीही शक्यता आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत