मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर राज्याचे नवे पोलिस महासंचालक?

मुंबई:रायगड  माझा 

 महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालकपदी मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्याचे पोलिस महासंचालक सतीश माथुर हे येत्या दहा दिवसांनी म्हणजे 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे माथूर यांच्या जागी कोण याची गृह विभागाच्या वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सध्याचे मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांचे नाव पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे. असे असले तरी दत्ता पडसलगीकर हे सुद्धा 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. मात्र, राज्य सरकार केंद्रीय गृहविभागाकडून विशेष परवानगी मिळवून तीन ते सहा महिन्यांची मुदतवाढ करून घेऊ शकते. तसे झाल्यास पडसलगीकर यांना किमान 5 व जास्तीत जास्त 8 महिन्यांकरिता राज्याचे महासंचालकपद मिळू शकते.

दरम्यान, पडसलगीकर महासंचालक झाल्यास मुंबई पोलिस आयुक्तपदावर कोण बसेल याचीही चर्चा सुरू झाली आहे. यात राज्य गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख संजय बर्वे आणि ठाण्याचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची नावे पुढे येत आहेत. परमबीर सिंह यांना मुंबईचे पोलिस आयुक्तपदी निवडण्याची जास्त शक्यता आहे.

राज्याचे पोलिस महासंचालक सतिश माथूर यांनी 1 ऑगस्ट 2016 रोजी पदभार स्वीकारला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत