मुंबई : रायगड माझा वृत्त
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक तसेच पादचारी मेटाकुटीला आले असतानाच एक चौरस मीटरचा एक खड्डा बुजवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला आठ ते नऊ हजार रुपयांचा खर्च येत असल्याचे उघड झाले आहे.
खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने यंदा 125 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुंबईतील रस्त्यांवर सध्या केवळ 30 खड्डेच असल्याचा मुंबई पालिकेचा दावा आहे.
किमान एक चौरस मीटरचा असावा खड्डा :
अपवाद वगळता शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असले तरी पालिकेच्या लेखी ते सर्वच खड्डे नाहीत. पालिकेच्या रस्ते अभियंता खात्याच्या खड्डे मोजण्याच्या अजब पद्धतीनुसार, चारचाकी वाहनाचे चाक अडकून ते कलंडू शकते, असा किमान एक चौरस मीटर आकाराचा खोल खड्डा असेल; त्यामुळे वेग मंदावून वाहने थांबत असतील, तरच तो खड्डा म्हणून गणला जातो.
खड्ड्यांवर कशा प्रकारे केला जातो खर्च :
खड्डा बुजवण्यासाठी वापरलेले तंत्रज्ञान, त्यासाठी सिमेंट-रेती-खडी-डांबराचे प्रमाण, खड्डा बुजवण्यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या-वाहने आदी बाबी खड्डे बुजवण्यासाठी येणाऱ्या खर्चात ग्राह्य धरल्या जातात. त्यामुळे एक चौरस मीटरचा खड्डा बुजवण्यासाठी आठ ते नऊ हजार रुपये खर्च होतो.
एखाद्या ठिकाणी 10 चौरस मीटरच्या पट्ट्यात पाच खड्डे असल्यास तेथे खडी, डांबराचा थर टाकला जातो. साहित्याचा खर्च वाढल्याने खड्डा भरण्याचा खर्चही वाढल्याचे रस्ते अभियंता खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पालिकेचे तत्कालिन अतिरिक्त आयुक्त असिम गुप्ता यांच्या कारकिर्दीत एक चौरस मीटर खड्डा भरण्यासाठी सहा हजार रुपये खर्च येत होता, अशी अधिकृत माहिती महापालिकेने तेव्हा दिली होती.