मुंबईच्या सर्व लोकल १५ डब्यांच्या होणार

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मुंबईतील उपनगरीय लोकल गाड्या १५ डब्यांच्या करण्याच्या सूचना रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिल्या आहेत. यासाठी येत्या दोन आठवड्यात योजनाबद्ध आराखडा सादर करण्याचे आदेशही मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोयल यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृहात बुधवारी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गोयल यांची बैठक झाली. या बैठकीत गोयल यांनी हे आदेश दिले. या निर्णयामुळे मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांची क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार आहे.

पश्चिम रेल्वेवरील १२ डब्यांच्या गाड्यांची क्षमता तीन हजार प्रवासी वाहून नेण्याची आहे. पण गर्दीच्या वेळी सुमारे साडेपाच हजार प्रवासी एका गाडीतून प्रवास करतात. म्हणजे गर्दीच्या वेळी डब्यातील फक्त एका स्क्वेअर मीटरमध्ये तब्बल १६ जण प्रवास करतात, हे रेल्वेच्या निदर्शनास आलं आहे. तर १५ डब्यांच्या गाड्यांची प्रवासी वाहन क्षमता ही ४, २०० इतकी आहे. पण या गाड्यांमधून सुमारे ७ हजार प्रवासी गर्दीच्या वेळी प्रवास करतात.

पश्चिम रेल्वेकडे सध्या फक्त ५ लोकल गाड्या १५ डब्यांच्या आहेत. या १५ डब्यांच्या गाड्यांच्या दिवसातू ५४ फेऱ्या होतात. तर मध्य रेल्वेकडे फक्त एकच लोकल १५ डब्यांची आहे. पश्चिम रेल्वेवर सध्या एक एसली लोकल धावतेय. दुसरी एसी लोकल पुढच्या महिन्यात दाखल होणार आहे. तर मध्य रेल्वेवर पुढच्या वर्षी जूनमध्ये एसी लोकल धावेल.

मुंबईत धावणाऱ्या सर्व लोकल गाड्या १५ डब्यांच्या करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यामुळे लोकल गाड्यांची प्रवासी वाहन क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार आहे. मध्य आणि पश्मिच रेल्वेच्या जलद मार्गावर या १५ डब्यांच्या लोकल सुरुवातीला धावतील. यानंतर धीम्या मार्गावरही १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत