मुंबईतील घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळले, ५ ठार

मुंबई : रायगड माझा वृत्त

घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया  लेन परिसरात चार्टर्ड विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. भर वस्तीत, रहिवाशी भागात विमान कोसळल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. या दुर्घटनेत एका पादचाऱ्यासह विमानातील चारही जणांचा मृत्यू झाला. दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मुंबईतील घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळले, ५ ठार

दुर्घटनाग्रस्त व्हीटी यूपीझेड, किंग एअर सी-90 हे चार्टर्ड विमान यूपी सरकारचं खासगी विमान होतं. मात्र हे विमान काही दिवसांपूर्वी यूपी सरकारने विकलं होतं. या विमानात पायलट आणि 3 तंत्रज्ञ असे एकूण चार जण होते. यामध्ये एका महिला पायलटचाही समावेश होता. या चौघांचा आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

या परिसरात मोठा आवाज होऊन आगीचे लोट पसरले. हा आवाज नेमका कसला? नेमकी घटना काय, हे बराच वेळ समजत नव्हतं. या घटनेनंतर परिसरात गोंधळाचं वातावरण आहे. जागृतीनगर जॉगर्स पार्कजवळ बांधकाम सुरु असलेल्या इमारतीनजीक चार्टर्ड विमान कोसळलं. भर वस्तीत विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली. विमान कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला आणि त्यानंतर आग लागली. आगीचे धूर परिसरात पसरत होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

उत्तर प्रदेशने विमान विकलं

हे विमान उत्तर प्रदेश सरकारचं होतं. मात्र या विमानाला अलाहाबादमध्ये अपघात झाला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने हे विमान मुंबईतील यूव्हाय एव्हिएशनला विकलं होतं. या कंपनीने अलाहाबादमधील अपघातामुळे विमानाला झालेला बिघाड दुरुस्त केला. त्यानंतर हे विमान उड्डाणासाठी पूर्णत: सज्ज आहे का हे तपासण्यासाठी आजची चाचणी घेण्यात येत होती.

जुहूवरुन उड्डाण

चाचणीसाठी दुपारी दीडच्या सुमारास जुहू हेलिपॅडवरुन या विमानाने उड्डाण केलं. मात्र घाटकोपरपर्यंत पोहोचताच दुर्घटनाग्रस्त झालं आणि भर वस्तीत कोसळलं.

घाटकोपरमध्ये नेमकं काय झालं?

 • 1.00 वा. दुपारी एकच्या सुमारास जुहूवरुन उड्डाण
 • दुपारी 1 वा 10 मिनिटांच्या सुमारास घाटकोपरमध्ये विमान कोसळलं
 • 1.16 वा. अग्निशमन दलाला पहिला कॉल
 • 1.37 वा. अग्निशमन दल घाटकोपरमध्ये घटनास्थळी दाखल
 • 1.39 वा. लेव्हल वन आगीची सूचना
 • 1.40 वा. आगीवर ताबा
 • तीन फायर इंजिन आणि 1 जंबो वॉटर टँकर घटनास्थळी

विमान नेमकं कसं होतं?

 • अपघातग्रस्त विमान – किंग एअर सी-90 विमान
 • UY एव्हिएशन कंपनीचं चार्टर्ड प्लेन
 • या विमानाची प्रवासी क्षमता 12
 • या विमानात चार जण होते. त्यापैकी दोन महिला होत्या. एक पायलट आणि एक तंत्रज्ञ
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत