मुंबईतील महानगरपालिकेच्या रुग्णालयात सफाई कामगारच करतात पोस्ट मॉर्टेम

मुंबई : रायगड माझा वृत्त

मुंबईतील महानगरपालिकेच्या रुग्णालयात प्रत्येकवेळी शवविच्छेदन म्हणजेच पोस्ट मॉर्टेम हे डॉक्टरांकडूनच होत असे नाही. काही वेळा ते सफाई कामगारांकडून देखील करण्यात येते. महिला मृतदेहांचेही शवविच्छेदन बऱ्याचदा तेथील सफाई कामगारांकडून केले जाते, असा गंभीर आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

Image result for शवविच्छेदन

खुद्द महापालिका प्रशासनानेही माहिती अधिकारात याला कबुली दिली आहे. या याचिकेची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला नोटीस जारी करत चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ही जनहित आदिल खत्री नावाच्या व्यक्तीने अॅड. शेहजाद नक्वी यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.

गेल्या वर्षी अचानक याचिकाकर्ते सायन रुग्णालयात गेले असता, तिथे त्यांना शवगृहात सफाई कामगार आणि शवागारसेवकाकडून चक्क शवविच्छेदन होत असल्याचे पाहायला मिळाल्यानंतर माहिती अधिकार कायद्याखाली यासंदर्भात माहिती मागितली असता अनेकदा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव असताना डॉक्टरांना शवागारसेवक, सहाय्यक डॉक्टर आणि सफाई कामगारांकडून सहाय्य केले जाते, असे उत्तर मिळाले.

याचपद्धतीने महिलांच्याही शवांचे प्रसंगी विच्छेदन केले जाते, असा आरोप याचिकाकर्त्यांनी याचिकेत केला आहे. केवळ प्रशिक्षित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शवविच्छेदनासाठी परवानगी देण्यात यावी, यासंदर्भात सर्व पालिका रुग्णालयांत नियमाप्रमाणे प्रक्रिया पार पाडण्यात यावी आणि खासकरून महिलांच्या शवांचे विच्छेदन करण्यासाठी केवळ महिला डॉक्टर आणि सहायकांना परवानगी देण्यात यावी, असे निर्देश महापालिका आणि राज्य सरकारला देण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.