मुंबईतील रस्त्यावर आज पासून धावणार मराठी तरुणांची नवी कॅब सेवा

मुंबई : रायगड माझा

मराठी चालकांनी आणि काही संघटनांनी ओला आणि उबर या कंपन्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून एकत्र येऊन नवीन टॅक्सी सेवा सुरु करायचे ठरवले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन १२ मे रोजी होणार आहे. या नव्या सेवेचे नाव सह्याद्री स्मार्ट सेफ प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच एस ३ असे असेल.

आता मराठी चालकांच्या प्रयत्नातून तयार झालेली एस ३ कॅब मुंबईतील रस्त्यावर धावताना दिसणार आहे. ओला, उबर यांसारख्या कंपन्यांच्या कॅब अॅपच्या माध्यमातून वापरणाऱ्या ग्राहकांना एस ३ कॅब हा नवा पर्याय मिळणार आहे. ओला-उबरच्या फसव्या आश्वासनामुळे ज्या चालकांना मोठा तोटा झाला, त्यांनी मिळून ही नवी सेवा सुरु केली आहे.

या एस ३ कॅबच्या निर्मितीसाठी गेल्या वर्षीपासून प्रयत्न सुरु होते. यामध्ये ओला आणि उबर यांच्या सेवेमध्ये जे अडथळे आहेत, ते दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ज्या गोष्टी चालक आणि प्रवासी यांच्या दोघांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत, त्यांना प्राधान्य दिले गेले आहे. यात केवळ मोबाईल अॅपद्वारेच नाही, तर आता कॉल करुनही आपण टॅक्सी बोलावू शकतो. यामुळे ज्यांना स्मार्टफोन वापरता येत नाही, त्यांनाही या सेवेचा लाभ घेता येईल. तर या सेवेमध्ये ओला-उबरपेक्षा कमी भाडे आकारले जाईल आणि भाडे पद्धती देखील वेगळी असेल, असा दावा संस्थापकांनी केला आहे.

प्रफुल्ल शिंदे आणि राजेश काळदाते हे दोन मराठी तरुण गेल्या एका वर्षापासून नवीन टॅक्सी सेवेची संकल्पना घेऊन फिरत होते. पण त्याला आर्थिक साथ मिळत नव्हती. ती साथ अखेर काही महिन्यांअगोदर भारत फ्रेटने दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज  १२ तारखेला या सेवेचे लोकार्पण केले जाईल. या कंपनीमध्ये आत्ताच ८०० हून जास्त चालकांनी आपली नोंदणी केली आहे. तर १० टॅक्सी युनियनने आपला पाठिंबा दर्शवून चालक देणार असल्याचे सांगितले आहे. ही सेवा सध्या तरी केवळ मुंबईमध्येच उपलब्ध असेल. पण आगामी काळात ही सेवा इतर शहरातही सुरु होईल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत