मुंबई : ‘किकी’ स्टंट करणारे पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : रायगड माझा वृत्त 

जगभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरलेल्या ‘किकी चॅलेंज’चं वेड अनेक तरुणांना लागलं आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर लोकलमध्ये अशाच प्रकारे ‘किकी’ स्टंट करून जीव धोक्यात घालणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा तरुण पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याला विरारमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्या इतर साथीदारांनाही पकडले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, विरार रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ वर ‘किकी’ स्टंट करणाऱ्या तीन जणांना पश्चिम रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं. निशांत (वय २०), ध्रुव शाह (वय २३), श्याम शर्मा (वय २४) अशी त्यांची नावे आहेत. ध्रुव हा ‘फंचो’ एन्टरटेन्मेंटचा सहसंयोजक आहे. तर निशांत हा टीव्ही मालिकांमध्ये काम करतो. लोकलमध्ये किकी स्टंट करतानाचा व्हिडिओ फंचो एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली व्हायरल करण्यात आला होता. हा व्हिडिओ युट्यूब आणि फंचो एन्टरटेन्मेंटच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अपलोड करण्यात आला होता.

किकी स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तरुणांचा शोध सुरू केला. विरार रेल्वे पोलिसांच्या पथकानं खबऱ्यांच्या मदतीनं ध्रुव शाह आणि त्याच्या अन्य साथीदारांना बुधवारी विरारच्या ग्लोबल सिटी परिसरातून अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत