मुंबई गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा लाँचच्या तिकिटाचे दर २९ रुपये पण घेतले जाते १८५ रुपये

  • मुंबई गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा लाँच तिकीट २९ रुपये पण प्रत्यक्षात तिकीट आकारले जाते १८५ रुपये
  • तिकिटाचा दर वाढीव का? याचा खुलासा करण्याची संजय सावंत यानीची मागणी
  •  प्रवासी तिकीटांचे दर मुंबई बंदर विश्वस्त मंडळाकडून ठरवले जाते.

मुरूड जंजिरा : अमूलकुमार जैन

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या वेसाईटवरील तिकीट शुल्क कॅल्क्युलेटरनुसार मुंबई गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा या प्रवासावरील एका प्रवाशाचे तिकीट दर फक्त रू. 29 दर्शविले जात असल्याने या प्रवासासाठी विविध बोट कंपन्या रू. 120 ते रू. 185 असे चार ते सहा पट दर का आकारीत आहेत. याचा खुलासा शासनाने करावा अशी मागणी अलिबाग येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली आहे. सावंत यांनी याबाबत मेरीटाईम बोर्डाच्या अधिका-यांशी संपर्क साधला असता त्यांना प्रवासी तिकीटांचे दर मुंबई बंदर विश्वस्त मंडळाकडून (मुंबई पोर्ट ट्स्ट) ठरविले जातात अशी माहिती देण्यांत आली.
मुंबई पोर्ट ट्स्ट तिकीट दर ठरवितात एवढे सांगून मेरीटाईम बोर्ड आपली जबाबदारी टाळू शकत नाही कारण या तिकीटांवरील लेखी कर मेरीटाईम बोर्ड वसुल करीत असते. तसेच मेरीटाईम बोर्डाच्या तिकीट शुल्क  कॅल्क्युलेटरनुसार हा दर फक्त रू. 29 प्रति प्रवाशी असेल तर हे तिकीट दर ठरविताना मुंबई पोर्ट ट्स्ट कोणत्या पध्दतीने हे दर ठरविते  याची माहिती प्रवाशांना दिली जात नाही अशी प्रतिक्रीयाही सावंत यांनी दिली आहे. काही प्रवाशांनी याबाबत मुंबई पोर्ट ट्स्ट कडून माहिती अधिकारामध्ये माहिती मागविण्यचा प्रयत्न केला परंतु मुंबई पोर्ट ट्स्ट माहिती देत नसल्याची तक्रार प्रवाशांनी सावंत यांच्याकडे केली आहे. हे दर ठरविताना मुंबई पोर्ट ट्स्टने प्रवाशी संघटनांकडून प्रवाशांची मते मागविली पाहिजेत असे मतही सावंत यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई मांडवा लाँच प्रवास करताना जे तिकीट दिले जाते त्यामध्ये मांडवा ते अलिबाग हा बस प्रवास मोफत असल्याचे सांगितले जाते. परंतु जर या बससेवची सुविधा जर प्रवाशांनी घेतली नाही तरी प्रवाशांना तोच तिकीट दर लावला जातो याबाबतही मुंबई पोर्ट ट्स्टने विचार करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.  केंद्रीय परिवहन मंत्री जलवाहतुकीचे समर्थन करताना जलवाहतुक ही रस्ता व रेल्वे मार्गापेक्षा कित्येक पटीने स्वस्त असल्याचा दावा करीत असतात. केंद्रीय मंत्री यांच्याच शब्दात रस्ते वाहतुकीसाठी प्रति किलोमीटर रू. 2 तर रेल्वेवाहतुकीसाठी प्रति किलोमीटर रू.1 तर जलवाहतुकीसाठी प्रति किलोमीटर फक्त 50 पैसे इतका खर्च येतो. मुंबई मांडवा जलमार्गावर चालणा-या पीएनपी मेरीटाईम कंपनींच्य बोटी ज्यांच्या कुटूंबीयांच्या मालकीच्या आहेत त्या आ.जयंत पाटील यांनी तर जलवाहतुकीसाठी प्रति किलोमिटर 25 पैसेच खर्च येतो असा दावा केला असून त्यांचे हे म्हणणे अलिकडेच एका इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिध्द झाले आहे.
जलवाहतुकीसाठी प्रति कीलोमीटर फक्त 50 पैसे इतकाच खर्च येत असेल तर मुंबई मांडवा व रेवस ते भाउचा धक्का या दरम्यान होणा-या जलहवातुकीसाठी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसे का उकळले जात आहेत असा सवाल प्रवाशांमधुन आता विचारला जावू लागला आहे.   देशातील 101 छोटे जलमार्ग राष्ट्रीय जलमार्गांमध्ये रूपांतरित करण्यासंबंधी महत्त्वपूर्ण विधेयक केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी 2015 मध्ये लोकसभेत सादर केले. यापूर्वी अस्तित्वात असलेल्या पाच राष्ट्रीय जलमार्गांखेरीज नव्या जलमार्गांची भर घातली जाणार असून जलमार्गांद्वारे मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे या विधेयकात स्पष्ट करण्यात आले होते. ‘राष्ट्रीय जलमार्ग विधेयक 2015’ अंतर्गत रस्ते आणि रेल्वे वाहतुकीच्या तुलनेत जलमार्गांचा वापर कितीतरी मागे असल्याने देशभरातील जलमार्ग आंतरदेशीय जलमार्गांशी जोडून एकात्म विकासावर भर दिला जाईल असे सरकारने जाहीर केले होते. कारण जल वाहतुकीवर प्रति किलोमीटर केवळ 50 पैसे खर्च होतात. रेल्वेमार्गाने एक रुपया तर रस्ते वाहतुकीतून दीड रुपया खर्च होतो, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली होती. त्यामुळे मांडवा जलवाहतुक मार्गावर वाहतुक करणान्या कंपन्यांना मोठ मोठया बोटी, इंधन खर्च, सुरक्षा साधने आदि सर्व बाबींचा खर्च येत असला तरी जलवाहतुकीसाठीच्या प्रमाणीत खर्चाचा अगदी वीस पट धरले तरी या मार्गावरील प्रवासी तिकीटांचे दर 100 रूपयांच्या आतच असावेत अशी अपेक्षा ब-याच प्रवाशांनी बोलून दाखविली आहे.
शेयर करा

2 thoughts on “मुंबई गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा लाँचच्या तिकिटाचे दर २९ रुपये पण घेतले जाते १८५ रुपये

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत