मुंबई चौथ्या स्थानी विराजमान; कोलकात्यावर मोठा विजय

मुंबई इंडियन्सचे आव्हान संपले, अशी टीका करणाऱ्यांना रोहित शर्माच्या सेनेने बुधवारी चोख उत्तर दिले. मुंबईच्या 211 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याचा डाव 108 धावावर संपुष्टात आला आणि मुंबईने 102 धावांनी मोठा विजय मिळवला.

कोलकाता : रायगड माझा ऑनलाईन

मुंबई इंडियन्सचे आव्हान संपले, अशी टीका करणाऱ्यांना रोहित शर्माच्या सेनेने बुधवारी चोख उत्तर दिले. इशान किशनच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना कोलकात्यापुढे 211 धावांचे आव्हान ठेवले होते. किशनने 21 चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 62 धावांची तुफानी खेळी साकारली. मुंबईच्या 211 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याचा डाव 108 धावावर संपुष्टात आला आणि मुंबईने 102 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह मुंबईने 10 गुणांसह चौथे स्थान पटकावले आहे. त्याचवेळी कोलकाताची एका स्थानाने पाचव्या स्थानी घसरण झाली आहे.

इडन्स गार्डन्स स्टेडियमवर नाणेफेक जिंकून कोलकाता कर्णधार दिनेश कार्तिक याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. परंतु, इशानने त्याचा निर्णय चुकीचा ठरवताना २१ चेंडूत ६२ धावांचा झंझावात सादर केला. त्याच्या जोरावर मुंबईने २० षटकात ६ बाद २१० धावांचा एव्हरेस्ट उभारला. या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान कोलकाताचा डाव १०८ धावांवर संपुष्टात आला. सलामीवीर ख्रिस लिन (२१), नितीश राणा (२१) आणि तळाच्या फळीतील टॉम कुरन (१८) यांच्या शिवाय इतर कोणताही फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांपुढे तग धरु शकला नाही. डावातील दुसºयाच चेंडूवर सुनिल नरेन (४) बाद झाल्यानंतर कोलकाताच्या फलंदाजीला गळती लागली. कृणाल – हार्दिक या पांड्या बंधूनी प्रत्येकी २ बळी घेत कोलकाताला रोखले.

तत्पूर्वी, इशान किशनने केवळ २१ चेंडूत ५ चौकार व ६ षटकारांसह ६२ धावांचा तडाखा दिला. त्याने चायनामन कुलदीप यादवच्या एकाच षटकात २५ धावा चोपताना त्याची लय बिघडवली. सुनिल नरेनने त्याला बाद केले खरे, परंतु तोपर्यंत मुंबईकर मजबूत स्थितीत आले होते. त्यापुर्वी, सूर्यकुमार यादवने ३२ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ३६ धावा केल्या. इशान बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (३६) आणि हार्दिक पांड्या (१९) यांच्या संथ खेळीमुळे मुंबईला भलीमोठी मजल मारता आली नाही. परंतु, बेन कटींगने अखेरच्या काही षटकांमध्ये चौफेर फटकेबाजी करताना ९ चेंडूत १ चौकार व ३ षटकारांसह २४ धावांचा चोप देत मुंबईला दोनशेच्या पलीकडे नेले. कोलकाताचा पियूष चावलाने ३ बळी घेतले असले तरी तो अत्यंत महागडा ठरला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत