मुंबई: मौजमजेसाठी पुतण्याचा काकाच्या घरी ‘डाका’

 

मुंबई : रायगड माझा वृत्त 

पुतणीच्या मुलाच्या बारशासाठी गेलेल्या अंधेरी येथील गोपाळ गुप्ता यांच्या घरात नुकतीच ३० लाखांची चोरी झाली. कार्यक्रम संपल्यावर घरी आल्यानंतर त्यांना तिजोरीतील ही रोकड लंपास झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी तक्रार कल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात गुप्ता यांच्याच पुतण्याने मित्राच्या सहाय्याने ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले.

अंधेरीत पश्चिमेला जुहू गल्लीच्या मदिना मशिद येथे गुप्ता यांचे तीन मजली घर आहे. त्यांच्या भावाच्या मुलीला मुलगा झाल्याने त्याच्या बारशाचा कार्यक्रम ५ ऑक्टोबरला कोलडोंगरी येथे आयोजित करण्यात आला होता. गुप्ता आपल्या कुटुंबीयांसह याठिकाणी गेले. सिगारेटचे वितरक असल्याने गुप्ता त्यांच्याकडे नेहमीच रोकड असते. बारशाचा कार्यक्रम आटोपून परतल्यानंतर तिजोरीतील ३० लाखांची रोकड गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत डी.एन. नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.

छतावरून घरात उतरून ही रोकड पळवण्यात आली होती. शिवाय तिजोरी वगळता सर्व सामान जागच्या जागी होते. त्यामुळे गुप्ता यांना ओळखणाऱ्या आणि ते कार्यक्रमाला जाणार असल्याची माहिती असलेल्याचा या चोरीत सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक परमेश्वर गणमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गिरवले आणि त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण युनिटने गुप्ता यांना ओळखणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले. पोलिसांनी बारशाच्या कार्यक्रमातील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने पाहिले असता, गुप्ता यांचा पुतण्या आणि त्याचे मित्र मध्येच एक ते दीड तास गायब झाल्याचे व पुन्हा कार्यक्रम संपताना परतल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या चौघांपैकी एकाला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडावाउडवीची उत्तरे दिल्यानंतर त्याने गुप्ता यांच्या पुतण्याच्या सांगण्यावरून ही चोरी केल्याची कबुली दिली.

मौजमस्तीसाठी चोरी

गुप्ता यांचा पुतण्या अल्पवयीन असून, तो कॉलेजमध्ये शिकतो. काकांकडे भरपूर रोकड असते हे त्याला माहीत होते. ही रक्कम मिळाल्यास मौजमस्ती करता येईल या उद्देशाने त्याने मित्रांच्या मदतीने चोरीची योजना आखली. चोरी केल्यानंतर चौघांनी पैसे वाटूनही घेतले, मात्र ते उधळण्याआधीच पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत