मुंबई विद्यापीठात सुवर्णकन्यांची बाजी!

मुंबई : रायगड माझा वृत्त

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यातील सुवर्णपदकांमध्ये या वर्षीदेखील मुलींनीच बाजी मारली असून 52 पैकी 45 पदकांवर नाव कोरले आहे. विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात पार पडलेल्या सोहळ्यात 332 यशस्वी विद्यार्थ्यांना पीएच.डी. आणि एमफिल पदवी आणि 52 सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. या वर्षी विविध पदवी अभ्यासक्रमांमध्ये 1,93,589 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ व नोबेल पुरस्कार विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्टस् यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी कुलपती राज्यपाल विद्यासागर राव, कुलगुरू सुहास पेडणेकर उपस्थित होते. वैज्ञानिकांनी संशोधनाबरोबरच मानवतावादी कार्यासाठी काम करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी रॉबर्टस् यांनी यावेळी व्यक्त केले. दीक्षान्त सोहळ्यात एकूण 52 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. 40 विद्यार्थ्यांनी ही पदके पटकावली. या एकूण 40 सुवर्णपदक विजेत्यांमध्ये 33 विद्यार्थिनी तर 7 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये सहा विद्यार्थ्यांनी प्रत्येकी दोन तर विधी शाखेच्या भूमी दफ्तरी व पार्श्व बनखरिया यांनी प्रत्येकी चार सुवर्णपदके मिळवली.

विद्यापीठात सुरू होणार ‘बाळ ठाकरे अध्यासन’ केंद्र
विद्यार्थ्यांना नेतृत्वाचे धडे देणारे ‘बाळ ठाकरे अध्यासन’ केंद्र विद्यापीठात सुरू होणार असल्याची माहिती यावेळी कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी दिली. या केंद्रासाठी राज्य सरकारने विद्यापीठाला पाच कोटी रुपये देण्याचे मान्य केल्याचेही ते म्हणाले. याशिवाय विद्यार्थ्यांना उद्योगाचे धडे देणारे सिंधु स्वाध्याय केंद्र, रत्नागिरी येथे मत्स्यप्रक्रिया आणि मूल्यवर्धन अभ्यासक्रम, वेंगुर्ला येथे सागरी संकलन केंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठ पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. याशिवाय समुद्राच्या खाली चाललेल्या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी, तेल, वायू शोधण्यासाठी प्रभावी उपाय, जमिनीवर गस्त घालण्यासाठी व्यवस्था, प्रदूषण निवासी मूल्यांकन आदींच्या संशोधनासाठी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत