मुख्यमंत्रीच काय, खडसेंना पंतप्रधानही व्हावे वाटेल; मंत्री गिरीश महाजन यांचा उपरोधिक टोला

 

रायगड माझा वृत्त 

नाशिक- माजी मंत्री एकनाथ खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना मुख्यमंत्रीच काय तर पंतप्रधानही व्हावेसे वाटेल. पण पक्षाला वाटणे महत्त्वाचे आहे. कारण भाजपमध्ये कोणत्याही पदावर नियुक्तीचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडूनच घेतला जातो, अशा शब्दात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. आज पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असूनही नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्याचे सांगून मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हेच कायम राहतील, असे महाजन म्हणाले.

भाजप-शिवसेना युती तोडण्यासाठी मी पुढाकार घेतला नसता तर आताचे चित्र दिसले नसते. त्यानंतर मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असूनही पक्षाच्या अादेशावर चालावे लागते. परंतु पक्षातील माझे ज्येष्ठत्व कुणीही हिरावू शकत नाही, असे विधान खडसे यांनी शनिवारी भुसावळ येथे पत्रकारांशी बोलताना केले होते. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जळगाव महापालिकेत भाजपला मिळालेल्या निकालावर खडसे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्या वेळी त्यांनी हे विधान केले होते.

दरम्यान, शेतकरी आंदोलन, मराठा अारक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी मुख्यमंत्री बदलाच्या वावड्या उठल्या व त्यापाठोपाठ खडसेंचे वक्तव्य आल्यामुळे यासंदर्भात रविवारी नियोजन समितीच्या बैठकीनंतर नियोजन भवनात नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना पत्रकारांनी छेडले. त्या वेळी महाजन यांनी खडसेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. ते म्हणाले, खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मंत्रिपदापासून विरोधी पक्ष नेते पदापर्यंतची पदे कशा पद्धतीने सांभाळली हे तुम्हाला माहिती आहे. पक्षाची चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडलेले असे ते नेते आहेत. त्यामुळे त्यांनाच काय राजकारणात सर्वांनाच आपण मुख्यमंत्री तथा पंतप्रधान व्हावेसे वाटते. परंतु, भाजपमध्ये कोणत्याही पद नियुक्तीचा निर्णय पक्षस्तरावर, वरिष्ठांच्या मान्यतेने होत असतो. केंद्रीय मंत्रिमंडळात व मंत्रिमंडळाबाहेर अनेक ज्येष्ठ नेते असतानाही मोदी पंतप्रधान झाले, असे सांगून फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाबाबत लवकरच निर्णय
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि राज्य शासन अनुकूल आहे. अधिवेशनास अजून बराच विलंब आहे. त्यापूर्वीच तांत्रिक अडचण दूर करून मराठा समाजासाठी अपेक्षित निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत