मुख्यमंत्री- खडसेंमध्ये वर्षा बंगल्यावर गुफ्तगू

Eknath Khadse

जळगाव : रायगड माझा वृत्त

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यात मुंबईतील वर्षा निवासस्थानी चर्चा झाली. त्यांच्यात काय ‘गुफ्तगू’ झाली, याबाबत मात्र समजू शकलेले नाही. फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री भुसावळ येथे विकासकामांचे भूमिपूजन व खासदार रक्षा खडसे यांच्या मतदारसंघातील विकासकामांच्या अहवालाचे प्रकाशन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई येथील मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी जळगाव व रावेर लोकसभेसंदर्भात पदाधिकारी, आमदार व खासदारांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी दोन्ही मतदारसंघांतील पदाधिकारी तसेच आमदार, खासदार उपस्थित होते. सर्व पदाधिकारी बैठकीस पोहोचल्यानंतर वरच्या हॉलमध्ये ही बैठक झाली.त्याअगोदर मुख्यमंत्री फडणवीस व खडसे या दोघांमध्येच चर्चा झाली. तब्बल पंधरा मिनिटे ही चर्चा झाली. त्यानंतर दोघेही बैठकीस गेले. त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली, हे मात्र समजू शकलेले नाही. भोसरी जमीन खरेदी प्रकरणात न्यायमूर्ती झोटिंग समितीने खडसे यांना क्‍लीन चीट दिल्याचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.खडसे यांच्यावर आता कोणताही आरोप नसल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबतही चर्चा सुरू झाल्या असल्याने दोघांतील ‘गुफ्तगू’चे गौडबंगाल कायम आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत