मुख्यमंत्री पदाची धुरा पाच वर्ष कुमारस्वामीचं सांभाळणार

बंगळूरू : रायगड माझा

कर्नाटकात एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वात काँग्रेस-जेडीएसने सरकार स्थापन केल्यानंतर मंत्र्यांच्या खाते वाटपावरून असलेल्या दोन्ही पक्षांमधील तक्रारी आता संपण्याच्या मार्गावर आहेत. दोन्हीही पक्षांचं खाते वाटपावर एकमत झालं आहे. काँग्रेस पक्ष कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाच वर्ष समर्थन देण्यासही तयार आहे. तसंच दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकही एकत्र लढवणार आहेत.

‘आमचं लक्ष फक्त खाते वाटपावर नसून युती मजबूत करण्यावर आहे. दोन्ही पक्ष मजबूत करण्यासाठी एक किमान समान कार्यक्रमाची आखणी केली जाते आहे, असं काँग्रेसचे महासचिव अशोक गहलोत यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितलं. कुमारस्वामी यांच्याचकडे पाच वर्ष मुख्यमंत्रिपद ठेवायचं की नाही, याबद्दल अजून निर्णय झाला नसल्याचं काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री परमेश्वर यांनी म्हटलं होतं. त्यामुळे काँग्रेसने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय.

दरम्यान, अर्थ मंत्रालय जेडीएसकडे असेल तर गृह मंत्रालय काँग्रेसला मिळणार आहे.’सगळे मुद्दे सोडवून युती सरकारला पाच वर्ष समर्थन द्यायला काँग्रेस तयार आहे. एचडी कुमारस्वामीच पाच वर्ष मुख्यमंत्रिपदावर असतील, या मुद्द्यावर दोन्ही पक्षात सहमती झाली आहे, असं जेडीएसचे महासचिव दानिश अली यांनी सांगितलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत