‘मुख्यमंत्री बदलासाठी भाजपात हालचाली’

 

नाशिक :रायगड माझा वृत्त 

काही दिवसांपासून मराठा मोर्चे, शेतकरी आंदोलन, जातीय दंगली याबरोबरच वाढती बेरोजगारी यामुळे जनतेच्या मनात सरकारविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यातून समाजात अस्थिरता निर्माण झाली असून, परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. याचा फटका आगामी निवडणुकात भाजपाला बसू नये, यासाठी भाजपा अंतर्गत मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, ते कितपत शक्य होईल हे सांगणे कठीण असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. शहर काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात काँग्रेस कमिटी हॉलमध्ये ते बोलत होते. आ. सुधीर तांबे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, राज्यात संभ्रमावस्थेचे वातावरण आहे. सार्वत्रिक निवडणूका वेळेआधीच घेतल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र, विधानसभा आणि लोकसभा एकत्रित घेतल्या जातील की नाही याबाबात संभ्रमावस्था आहे. केंद्र सरकारविरोधात दाखल झालेल्या अविश्‍वास ठरावाने निवडणुकीचा बिगुल फुंकला गेला आहे. सध्या केंद्र आणि राज्य सरकारची मानसिकतेचे शेवटचे दिवस अशी असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. गेल्या साडेतीन वर्षात सरकारला कोणत्याही आश्‍वासनाची पूर्तता करता आलेली नाही. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात घोषणांचा पाऊस पाडून जनतेची दिशाभूल केली जाऊ शकते.

स्टार्ट अप इंडिया,  मेक इन महाराष्ट्र या योजनेतून किती उद्योग आले. किती रोजगार उपलब्ध झाले यांची कोणतीही आकडेवारी सरकारकडे नसल्याचेे ते म्हणाले. तसेच, शेतकरी विरोधी धोरणामुळेच शेतकरी देशोधडीला लागला असून, तूरडाळ, साखरेचे मुबलक उत्पन्न होऊनही या वस्तू परदेशातून आयात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना आपला माल कवडीमोल भावाने विकावा लागल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपा सरकार भ्रष्टाचारी असून, भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या मुलाच्या संपत्तीत झालेली वाढ, मुंबई येथील भूखंड घोटाळा अशा अनेक प्रकरणात  मोठे घोटाळे उघड झाल्याचे आरोप करत आगामी निवडणुकांत भाजपा सरकार सत्तेवरून पायउतार होईल असा विश्‍वास व्यक्त केला. यावेळी पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री शोभा बच्छाव यांनी मार्गदर्शन केले. प्रदेश सरचिटणीस डॉ.हेमलता पाटील, मनपा गटनेते शाहू खैरे, राहुल दिवे, वत्सला खैरे, तुषार शेवाळे, बबलू खैरे आदी उपस्थित होते.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत